(राजमुद्रा वृत्तसेवा) | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सध्या खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत, राज्य सरकारला अल्टिमेटम दिला असून ते राज्यभर दौरा करून अनेक नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. या पाठोपाठच अनेक संघटना देखील आता आक्रमक होताना दिसत आहेत. दरम्यान, भाजपा नेते नारायण राणे यांनी संभाजीराजेंवर या मुद्यावरून काल (ता 3) पुण्यात टिप्पणी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता संभाजीराजेंनी ट्विटद्वारे इशारा दिल्याचे दिसत आहे.
“छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे आणि ताकदच पहायची असेल, तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे, कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे.” असं संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
नारायण राणे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत संभाजी राजे यांच्यावर टीका करत “छत्रपती संभाजीराजे यांच्यात धमक दिसत नाही. खासदारकीची मुदत संपत आली की आंदोलनाची, राजीनामा देईन, पक्ष काढेन अशी भाषा सुरु आहे. छत्रपती संभाजीराजे कोकणात आले? कधी कुठे आले, मला भेटले नाही. मला समजलं असतं तर मी स्वागत केलं असतं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन आरक्षण मिळत नाही आणि असं पुढारी होत नसतात. राजे हे समाजानं म्हणावं लागतं. आता टर्म संपत आल्यावर राजेंनी राजीनामा देऊ नये. राजे फिरताहेत पण रयत आजूबाजूला दिसत नाही. राजांना रयत भेटायला येते. हे का फिरतायत?”, असे वक्तव्य केले होते यावर आज संभाजी राजे यांनी आज ट्विटरवर आपले मत व्यक्त करत सूचक इशारा दिला.