मुंबई राजमुद्रा दर्पण | करोनाच्या ओमायक्रॅान विषाणूचे नवे विषाणू असलेले बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण महाराष्ट्रात आढळल्याने चिंतेचे कारण बनले आहे. या प्रकारांचे सात रुग्ण पुणे शहरात सापडल्याने दक्षता घेण्यात येत आहे. यादरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यातील जनतेला आवाहन केले आहे. आणि काळजी घ्यायचा सल्ला दिला आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने शनिवारी आपल्या दैनंदिन अहवालातून याबाबत माहिती दिली आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) केलेल्या जनुकीय तपासणीत हे नवे प्रकार आढळले असून फरिदाबाद येथील इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर (आयबीडीसी) या संस्थेने त्यास दुजोरा दिला आहे. राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, हे सर्व रुग्ण पुणे शहरातील आणि ४ मे ते १८ मे २०२२ या कालावधीतील आहेत. त्यांत चार पुरुष, तर तीन महिला आहेत. चार रुग्ण ५० वर्षांवरील वयोगटातील तर दोन २० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. एक रुग्ण नऊ वर्षांचा आहे.