जळगांव राजमुद्रा दर्पण | मुख्यमंत्री आमचे असताना आमच्यावर इतकी बिकट परिस्थिती आली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अशी खंत व्यक्त केली. शिवसेना शिवसंपर्क अभियान अंतर्गत मुक्ताईनगर येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी ही खंत व्यक्त करून दाखवली. शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची या सभेला विशेष उपस्थिती होती.
शिवसेना तालुकाप्रमुख विधानसभा क्षेत्र प्रमुख यांच्या विरोधात धादांत खोटे गुन्हे दाखल झाले. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, गुन्हे दाखल होत असले तरी आम्ही निधड्या छातीचे शिवसैनिक आहोत. जर गुन्हा केला असेल तर निश्चित सांगू. गुन्हा करून लपून राहणाऱ्यांपैकी आम्ही नव्हे. आमची पण वेळ येईल आणि प्रत्येक शब्दाला उत्तर देण्यात येईल. खटल्याशी आम्ही दरात नाही. असा टोलाही यावेळी आमदार पाटील यांनी लगावला.
भाषण करताना खासदार माने म्हणाले की, जिल्ह्यात ११ पैकी ५ आमदार आहेत आणि लवकरच ११ पैकी ११ आमदार शिवसेनेचे असणार आहे. तर दुसरीकडे शिवसंपर्क अभियानाच्या यासभेत जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर, गजानन मालपुरे, उत्तम सुरवाडे, गजानन खेकडे, सुनील पाटील, पंकज राणे, अफसर खान, आनंदा पाटील, सुरेश परदेशी आदी प्रमुख व्यक्ती मंचावर उपस्थित होते.