(पुणे राजमुद्रा वृत्तसेवा) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी ‘आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे मोदींना पत्र लिहतील’ असा टोला लगावला होता. त्यावरुनच आता संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांनी आपण काय बोलतोय याचं भान ठेवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
एक जून रोजी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये सगळ्याच गोष्टींसाठी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असल्याची टीका करताना चंद्रकांत पाटलांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा पकडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर निशाणा साधला होता. याचसंदर्भात राऊत यांना आज पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “चंद्रकांत पाटील म्हणजे काही वसंतदादा पाटील नाहीत. ते विरोधी पक्षाचे प्रमुख आहेत. ते त्याचं मत मांडू शकतात. पण व्यक्तीगतरित्या बोलताना प्रमुख पदावरील व्यक्तीने आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे. तुम्ही असं व्यक्तीगतरित्या कोणाकडे बोट दाखवाल तर काही बोटं तुमच्याकडेही वळलेली असतात हे लक्षात घ्यायला पाहिजे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
“सरकार प्रत्येक गोष्ट केंद्रावर ढकलत आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा उद्धव ठाकरे पंतप्रधांनांना पत्र लिहतील” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारण्यात आलेला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. महाविकास आघाडीला वाटतं की जनता मूर्ख आहे असंही ते यावेळी म्हणाले. गेल्या दीड वर्षांपासून राज्यात मागास आयोग नाही. त्यामुळे इथं केंद्राचा काहीही संबंध नाही. पण हे सरकार कोडगं आहे. उद्या आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघायची असेल तेव्हा तुमच्या बघण्यातली दिल्लीतली कोण असेल तर सांगा म्हणून उद्धव ठाकरे पंतप्रधानांना पत्र लिहतील, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर आज संजय राऊत यांनी निशाणा साधला.