जळगांव राजमुद्रा दर्पण | शहर मनपात शिवसेनेची सत्ता आहे तरीही पक्षाच्या चार नगरसेवकांचा प्रभाग ५ मध्ये तुटलेल्या गटारीच्या दुरुस्तीचे काम अनेक महिन्यांपासून राहिले असून अद्याप ते पूर्ण झाले नाही यामुळे नागरिक विचारात पडत आहे.
नगरसेवकच काय तर माजी उपमहापौर आणि दोन माजी नगरसेवकांच्या रहिवासी भागात असून देखील ते काम अद्याप रखडलेले आहे. नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्या नुसार गटारीचे काम कुणीतरी एका नगरसेवकाने घेतले असून त्यांनी ते सुरु केल्यास होऊ शकते असे उत्तर नागरिकांना मिळाले.
मनपा अंतर्गत विकासकामांसाठी गेल्या काही महिन्यात मोठा निधी उपलब्ध झाला होता. काही कामांना सुरुवात होऊन मंजुरी मिळाली आहे. मुख्य रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली असून काही प्रभागात विशेषतः प्रभाग ५ मध्ये गटारींची कामे सुरु आहेत. जळगाव शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणजे प्रभाग ५ आहे.
शनिपेठपासून सुरु होऊन शाहूनगर व्हाया गांधीनगर जाणाऱ्या या प्रभागाचे नगरसेवक देखील दिग्गज आहेत. प्रभाग ५ चे नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, राखी सोनवणे आणि ज्योती तायडे हे आहेत.प्रभाग ५ मधील शनीमंदिरासमोरील गल्लीत माजी उपमहापौर अनिल वाणी, माजी नगरसेवक सुनील माळी, प्रशांत पाटील, प्रभाग समिती सदस्य जगदीश नेवे हे राहतात. काही महिन्यांपूर्वी रस्त्याचे काम सुरु असताना गटारीवरील ढापा तुटल्याने मोठा खड्डा पडला होता. त्वरित दुरुस्ती न केल्याने खड्डा वाढतच गेला असून जवळपास अर्धी गटार तुटून रहदारीसाठी रस्ता अर्धाच राहिला आहे.
गटारीचे काम करण्यासाठी नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला तरी देखील अद्याप काम मार्गी लागलेले नाही. परिसरातील स्वच्छता नियमित होत नाही त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतो.