जळगाव राजमुद्रा दर्पण | जिल्ह्यात चोरट्यांची चांदी चांदी होत आहे. दिवसेंदिवस चोरीच्या घटनांचा आलेख उच्चांक गाठताना दिसत आहे. त्यातच चोरट्यांनी एटीएम फोडून लाखो रुपयाचा ऐवज लांबविल्याची घटना एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. युनियन बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून, नऊ लाख ५५ हजारांची रोकड चोरट्यांनी स्वतःच्या खिशात घातली.
कासोदा येथील बिर्ला चौकात असलेल्या युनियन बँकेचे एटीएम मशीन (ATM machine of Union Bank) आहे. चोरट्यांनी मध्यरात्री एटीएम मशीनमध्ये घुसले आणि गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापले.चोरट्यांनी एटीएममध्ये शिरताच आतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे फवारला. त्यामुळे एटीएममध्ये चोरांच्या हालचाली कैद झाल्या नाहीत. एटीएममध्ये एकूण २८ लाखांची रोकड होती. त्यापैकी ३१ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत १८ लाख ६८ हजार रुपये ग्राहकांनी काढले होते. त्यामुळे एटीएममध्ये ९ लाख ५५ हजार रुपये शिल्लक होते. ती रोकड चोरट्यांच्या हाती लागली.चोरट्यांनी सोबत चारचाकी आणली होती, त्यातूनच ते पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी काकडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले, सहायक निरीक्षक नीता कायटे घटनास्थळी हजर झाले. जंजीर या श्वानास पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरट्यांचा तपास अद्याप लागला नाही. या ठिकाणी ठसे तज्ञांना देखील बोलवण्यात आले होते. पुढील तपास सुरू आहे.