जळगांव राजमुद्रा दर्पण | कपाशीच्या बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. आणि त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप शामराव पाटील ( रा. चिखली, ता. मुक्ताईनगर) आणि गोपाळ वामन जवरे ( रा. जवळा बाजार, ता. नांदुरा, जि. बुलढाणा ) यांना मुक्ताईनगर येथील कृषी विभागाने पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले.
दोघांकडील एकूण ५६, ७०० रूपयांची बनावट बियाणे जप्त करण्यात आली असून ही कारवाई १ जून रोजी केली आहे. बाजारात कपाशीच्या बियाण्यांची विक्री सुरू झाली असून काही भामटे बनावट बियाण्यांची विक्री करून शेतकर्यांची फसवणूक करत असल्याने दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर प्रकार लक्षात घेऊन कृषी खात्याने आपल्या मोहिम अधिकार्यांच्या माध्यमातून नजर ठेवली. या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके निरिक्षक तसेच मोहिम अधिकारी विजय दगू पवार यांना मुक्ताईनगरात कपाशीच्या बनावट बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्यात आली.
कपाशीच्या बीयाण्यांची विक्री केल्याप्रकरणी दोघांवर मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला. ही कारवाई मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे निरिक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक बोरकर, परवीन तडवी व पो. ना. विजय पढार यांच्या पथकाने केली.