मुंबई राजमुद्रा दर्पण | कोरोनाची चौथी लाट येणार की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत दैनंदिन वाढ होताना दिसत आहे. गेले अनेक दिवस हजाराच्या आत असलेली रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा पार केला.
काल कोरोनाच्या 1081 नव्या प्रकरणाची नोंद झाली आहे. मुंबईत 739 नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईत शंभरच्या मागेपुढे रुग्ण होते. आता हजाराकडे वाटचाल करतांना दिसत आहे. याची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्ष या निवासस्थानी टास्कफोर्सची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री आज कोरोना संदर्भात टास्कफोर्ससोबत चर्चा करणार आहेत. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर इशारा दिला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढली तर निर्बंधाबाबत विचार करावा लागेल, असं अजितदादा म्हणाले. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले आहे. 5 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून देशात 19 हजार 509 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.