(राजमुद्रा वृत्तसेवा) केंद्र सरकारने प्रसारमाध्यमांसाठी लागू केलेल्या नवीन नियमावलीवरून ट्विटर आणि भारत सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली असतानाच आज पुन्हा एकदा नव्या वादाची ठिणगी पडली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलसमोरील ब्लू टिक ट्विटरने काही काळासाठी हटवली होती. केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केल्यानंतर ट्विटरने अकाऊंटसमोर पुन्हा ब्लू टिक सक्रीय केली आहे. हा वाद संपत नाही तोच तोच ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टिक काढून टाकली आहे. मोहन भागवत यांच्या ट्विटर हॅण्डलवरील ब्लू टीक काढून टाकल्याने विश्व हिंदू परिषदेने तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना ट्विटरची तुलना थेट ईस्ट इंडिया कंपनीशी केली आहे.
विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बंसल यांनी याबाबत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी ट्विटरची धोरणं ही व्यक्तीच्या विचारसणीनुसार वेगवेगळी आहेत का, असा प्रश्न उपस्थित केलाय. तसेच ट्विटरला त्यांनी भारतीय तुम्हाला आपलं करु शकतात तसं नाकारु शकतात असंही म्हटलं आहे.
“ट्विटर ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे वागत आहे. इथूनच पैसा कमावायचा आणि इथल्याच लोकांवर बंदी आणायची. भारताच्या एकतेला, स्वाधिनतेला आव्हान देणाऱ्या तसेच भारतावर हल्ला करणाऱ्यांना आसरा देण्याचं काम ट्विटर करतं. कधी राष्ट्रवादी विचारसणी असणाऱ्या लोकांचं ट्विट अकाऊंट सस्पेंड करणं, कधी त्यांच्या ब्लू टीक काढणं, फॉलोअर्स कमी करणे, नोटीस पाठवं असे अनेक उद्योग ट्विटर करतं. हा मनमानी कारभार किती दिवस चालणार आहे? जे लोक देशाविरोधात बोलतात, जे लोकांविरोधात देशद्रोहाच्या गुन्ह्याअंतर्गत खटले सुरु आहेत त्यांचे ट्विटर अकाऊंट तर तुरुंगात असतानाही व्हेरिफाय होतात,” असं बंसल म्हणालेत.
पुढे बोलताना बंसल यांनी, अनेक राष्ट्रवादी लोक आहेत जे अनेक वर्षांपासून देश आणि धर्माची सेवा करत आहेत त्यांच्या अकाऊंटला अनेक वर्ष ब्लू टीक मिळत नाही. अशांपैकी ज्यांना ब्लू टिक मिळालीय ती कधी काढली जाईल काही सांगता येत नाही. असा मनमानी कारभार सहन केला जाऊ नये. एका पक्षासाठी वेगळा नियम, दुसऱ्या बाजूच्या विचारसणी असणाऱ्यांना वेगळा नियम असं होता कामा नये. धोरणं ही सर्वसमावेशक असावीत. उजव्या विचारसणीच्या लोकांसाठी वेगळी, डाव्या विचारसणीच्या लोकांना वेगळी धोरणं असं होता कामा नये. जिहादी लोकांसाठी वेगळी धोरणं, हिंदूंसाठी वेगळी धोरणं असं होता कामा नये. मला वाटतं की ट्विटरने आपल्या धोरणांबद्दल विचार केला पाहिजे. नाहीतर भारतीय लोक ज्यापद्धतीने अशा गोष्टी स्वीकारतात त्याच पद्धतीने ते या गोष्टी सोडण्याबद्दलही चांगल्याप्रकारे जाणतात,” असा इशाराही ट्विटरला दिलाय.