जळगांव राजमुद्रा दर्पण | तीन दिवसांअगोदरच मान्सून केरळ मध्ये दाखल झाला होता. त्यानंतर हवामान विभागाकडून पावसाचा दुसरा अंदाज जाहीर करण्यात आला आहे.
देशात जून ते सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पाऊस वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात जळगावसह १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊसाची शक्यता आहे. म्हणजेच 106 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाचा हा अंदाज हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिल्लीत झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत जाहीर केला. हवामानशास्त्र विभागाने याआधी 14 एप्रिलला पावसाचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत 99 टक्के पाऊस पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु सध्याची हवामानाची स्थिती लक्षात घेता पावसाच्या प्रमाणाचा अंदाज वाढविण्यात आला असून, तो 103 टक्के करण्यात आला आहे. अर्थात, त्यामध्ये चार टक्के कमी-अधिक होण्याची शक्यताही गृहीत धरण्यात आली आहे.दरम्यान, यंदा राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक,औरंगाबाद, लातूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच 106 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रात २ ते ५ जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळीवारा, मेघगर्जना तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून, काल उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात वादळीवाऱ्यामुळे शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे.