जळगाव राजमुद्रा वृत्त सेवा |महानगर पालिकेतील बहुचर्चित घरकुल घोटाळा सर्वश्रुत आहे. या घोटाळ्यात शिक्षेस पात्र असलेले विद्यमान नगरसेवक अद्यापही पालिका सदस्य म्हणून पदावर आहेत. त्यांना अपात्र ठरवून त्यांची सदस्यता काढून घेण्यात यावी, यासाठी महासभेत हा विषय गांभीर्याने घेऊन यावर विचार करण्यात यावा या आशयाचा अर्ज नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी महापौर जयश्री महाजन यांना शुक्रवारी (ता 30) दिला आहे.
महानगरपालिकेत 2018 ते 2023 या कालावधीत पालिका सदस्य असलेल्या भगत रावलमल बालाणी, दत्तात्रय देवराम कोळी, लताबाई रणजीत भोईटे, सदाशिवराव गणपत ढेकळे व स्वीकृत नगरसेवक कैलास नारायण सोनवणे या नगरसेवकांना 2019 20 या कालावधीत घरकुल घोटाळ्यात जबाबदार धरून शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झालेली असताना सदर शिक्षेला अद्याप कोणतीही स्थगिती मिळालेली नाही. असे असताना विद्यमान नगरसेवक पालिका सदस्य म्हणून अद्याप पदावर आहेत. त्यांना अपात्र ठरवून त्यांचे सदस्यत्व काढून घेण्यात यावे, यासंबंधी गांभीर्याने विचार करून महासभेत या विषयावर चर्चा करण्यात यावी अशा आशयाचा अर्ज महापौर जयश्री महाजन यांना नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. सदर नगरसेवक पालिका सदस्य म्हणून अनर्ह असल्याने त्यांना पालिका सदस्य म्हणून राहण्याचा कोणताही अधिकार नाही असे या अर्जात नमूद करण्यात आलेले आहे.