जळगाव (प्रतिनिधी) : मेटोरोल स्टील प्रस्तुत ‘क्रेडाई महाराष्ट्र’ या बांधकाम व्यावसायिकांच्या राज्य पातळीवरील शिखर संघटनेचे राज्यभरातील बांधकाम व्यावसायिकांसाठी गोवा येथे दोन दिवसीय विशेष अधिवेशन दि. २७ व २८ मे आयोजित केले होते. राज्यातील क्रेडाईच्या शहर, तालुका आणि जिह्वास्तरीय ६२ शाखांमधून सुमारे ५०० पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिकांनी या अधिवेशनामध्ये भाग घेतला. यात जळगावच्या संस्थेच्या नवीन सदस्यांनी सहभाग घेतला होता.
याबाबतची माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरडे, उपाध्यक्ष व समन्वयक दीपक सूर्यवंशी व कार्यकारीणी मंडळ यांनी दिली. क्रेडाई-महाराष्ट्र युथ विंग आणि वूमन्स विंग यांच्या माध्यमातूनही अनेक उपक्रम राबवित असते.
“महाकॉन-२०२२” हा क्रेडाई महाराष्ट्राचा सलग ८ वर्षे सुरु असलेला हा उपक्रम, सभासदांना अत्याधुनिक बांधकाम प्रणाली, अद्ययावत कायदे, कर रचना, ग्राहक हीत, आर्थिक शिस्त, व्यावसायिक बांधिलकी या व इतर अनेक विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन देणारे व्यासपीठ उपलब्ध करतो. देश व राज्य पातळीवरील आव्हानात्मक परिथितीमुळे गृहबांधणी क्षेत्रासाठी भविष्यकालीन उपाययोजना आखणीसाठी मार्गदर्शन ह्या अधिवेशनात करण्यात आले.
“कनेक्ट फॉर टुगेदरनेस” असे ब्रीद वाक्य घेऊन संपन्न झालेल्या महाकॉन-२०२२ चे उद्घाटन व महाकॉन स्मरणपत्रिकेचे “एमपॉवरमेन्ट इन टूगेदरनेस” चे अनावरण क्रेडाई नॅशनल चेअरमन सतीश मगर यांच्या हस्ते पार पडले.
तत्पूर्वी क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व समन्वयक दीपक सूर्यवंशी यांनी सदस्यांचे स्वागत केले. तसेच अध्यक्ष सुनील फुरडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांना सद्यस्थिती व भविष्यातील व्यवसाय याबद्दल मार्गदर्शन केले.
क्रेडाई-नॅशनल चे उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया व अनंत राजेगावकर, जितेंद्र ठक्कर, क्रेडाई-नॅशनल च्या कार्यकारी व शासन समितीचे सभासद यांनीही सभासदांना महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर मेटारोल इस्पात प्रा. ली. चे व्यवस्थापकीय संचालक यतीन केसरीया व अन्य तज्ज्ञ वक्ते देखील बांधकाम विषयांवर दोन दिवस मार्गदर्शन केले.
सी ए वर्धमान जैन यांनी आयकर संदर्भात व त्यातील अनेक तरतुदींबाबत, संजय घोडावत यांनी छोट्या शहरात राहून सुद्धा मोठी स्वप्न कशी पुरी करता येतात याविषयी तर डॉ. अनिल लांबा यांनी व्यवसाय का तोट्यात जातो व त्यावरच्या उपाययोजना विशद केल्या.
विजय जोशी यांनी बांधकाम क्षेत्रात येवू घातलेले नविन तंत्रज्ञान व त्याचा व्यवसायावर होणारा परिणाम , विशाल गुप्ता यांनी घराचा ताबा दिल्यानंतर विकासक कश्याप्रकारे देखभाल करू शकतो व त्याचे फायदे समजाउन सांगितले. सर्वेश जावडेकर यांनी बहूमजली इमारतींचे नियोजन, डॉ. संजय रुणवाल यांनी व्यवसाय वृद्धी तर सचिन कुलकर्णी यांनी व्यवसायात घ्यावयाची काळजी या बद्दल मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात बांधकाम क्षेत्रास उज्ज्वल भवितव्य असेल अशी ग्वाही क्रेडाई नॅशनलचे चेअरमन सतीश मगर यांनी दिली . राज्यातील प्रत्येक बांधकाम व्यावसायिकाच्या दृष्टीने तसेच बांधकाम क्षेत्राच्या एकूण वाटचाल व नवीन तंत्रज्ञानाचा वापर या दृष्टीने हे “महाकॉन-२०२२” अत्यंत मोलाचे ठरले असे प्रतिपादन त्यांनी केले.
तत्पूर्वी सर्व वक्त्यांचा, मान्यवरांचा, सर्वात जास्त सहभाग नोंदविणाऱ्या शहराचा, मेटारोल, एसकॉन व पारस पाइप ह्या प्रयोजकांचाही गौरव करण्यात आला.
मानद सचिव सुनील कोतवाल व कार्यकारीणी मंडळ यांनी आभार प्रदर्शन केले. क्रेडाईच्या या वार्षिक अधिवेशनामध्ये राज्याचे सहसचिव अनिश शहा, जळगाव संस्थेचे सचिव दीपक सराफ, निर्णय चौधरी, पुष्कर नेहते, ललित भोळे, सचिन धांडे, तुषार महाजन, निलेश पाटील, योगेश खडके हे सहभागी झाले होते.