अकोला राजमुद्रा दर्पण |राज्य सरकार म्हणजेच महाविकास आघाडीने शेतकरी वर्गासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने 31 मे पर्यंत कापूस बियाणे विक्रीवर बंदी घातली होती. मात्र, ती बंदी 1 जूनपासून काढण्यात आली आहे. त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बियाणे खरेदी करण्यासाठी लगबग पाहायला मिळते.
खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे आणि शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. बहुतांश भागात शेतीचे काम पूर्ण झाले आहेत तर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे चांगल्या पावसाची. या खरीप हंगामात पांढर सोन असलेल्या कापूस बियाणाच्या दरातही वाढ झाली असून बाजारात आता शेतकऱ्यांची कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.मात्र बियाणे उत्पादक कंपन्यांनी केलेली दर वाढ शेतकऱ्यांनाच पीक हाती येण्याआधीच कंबरडे मोडणार आहे. कापूस बियाण्याच्या दरात झालेली वाढ कापसाच्या पिकापर्यंतही कायम राहणार का असा सवाल उपस्थित होत आहेत.
यंदा अकोल्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला विक्रमी असा 14 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे या खरीपात कापसाचे क्षेत्र वाढणार हे साहजिकच दिसून येत आहे. कापसाच्या बियाण्याची मागणी पाहता यंदा कापसाच्या क्षेत्रात 12 ते 15 टक्के वाढ होणार असल्याचं अंदाज कृषी व्यवसायिकांनी लावला आहे. मागील वर्षी 767 रुपयांच्या बियाणाच्या पाकीटसाठी शेतकऱ्यांना आता 810 रुपये मोजावे लागणार असल्याचे समजते. म्हणजेच प्रति पेकेट 43 रुपयांची वाढ झाली आहे. तर मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 6 टक्क्याने बियाणे भावात वाढ झाली आहे. म्हणून या हंगामापासूनच वाढीव दराने शेतकऱ्यांना बियाणांची खरेदी करावी लागणार आहे.