काश्मीरमधील टार्गेट किलिंगवरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, “१९९० च्या दशकात जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती काश्मीर खोऱ्यात परत येत आहे.” गेल्या काही आठवड्यात दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील अनेक काश्मिरी पंडित आणि हिंदूंना निशाणा बनवला आहे.
काश्मीर मधील बँक मॅनेजरची गोळी झाडून हत्या :-
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. कुलगाम मधील आरेह मोहनपोरा येथील स्थानिक देहाती बँकेत ही घटना घडली. लश्कर-ए-तैयबाची प्रतिबंधित दहशतवादी संघटना रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
हिंदू महिला शिक्षिका रजनी बाला यांचीही हत्या :-
काही दिवसांपूर्वी, जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील रजनी बाला या ३६ वर्षीय हिंदू महिला शिक्षिकेची कुलगाममधील गोपालपोरा येथील सरकारी शाळेत दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. याआधी, काश्मिरी पंडित करमारी राहुल भट यांच्यासह दोन नागरिक आणि तीन ऑफ ड्यूटी पोलिस कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांनी मारले होते.
संजय राऊत म्हणाले, “१९९० च्या दशकात जशी परिस्थिती होती तशीच आज काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे. तुम्ही (भाजप) काश्मिरी पंडितांना खोऱ्यात परत आणण्याबद्दल बोललात आणि हिंदुत्वाच्या नावावर मते मिळवता. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याने लोकांच्या जीवनात कोणतीही सुधारणा झालेली नाही.”