(राजमुद्रा वृत्तसेवा) महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पणतीला ६० लाख रँडचा घोटाळा आणि खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेच्या डर्बन कोर्टाने ७ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अशिष लता रामगोबीन यांना कोर्टाने दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली आहे. व्यावसायिक एस. आर. महाराज यांच्याकडून त्यांनी जवळपास ६० लाख रँड घेतले होते. भारतातून येणाऱ्या मालावर आयात आणि सीमा शुल्क माफ करुन घेण्यासाठी त्यांनी हे पैसे घेतले होते. पण, याप्रकरणी एस आर. महाराज यांची फसवणूक करण्यात आली असल्याचे उघड झाले.
अशिष लता रामगोबीन या प्रख्तात कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबीन यांच्या कन्या आहेत. त्यांच्याविरोधात २०१५ मध्ये खटला दाखल करण्यात आला होता. नॅशनल प्रॉसीक्यूटिंग अथॉरिटी (NPA) चे ब्रिगेडियर हँगवानी मुलादझी यांनी म्हटलं की, अशिष लता रामगोबीन यांनी खोटी स्वाक्षरी आणि कागदपत्रे सादर केली होती. जेणेकरुन गुंतवणूकदारांना भारतातून तीन कंटेनर दक्षिण आफ्रिकेत आणले आहेत ते सांगता यावं. याआधी लता रामगोबीन यांना ५० हजार रँडवर जामीन मिळाला होता.
न्यु आफ्रिका अलीअन्स फुटवेअर डिस्ट्रीब्युटरचे संचालक एस आर महाराज यांना अशिष लता ऑगस्ट २०१५ मध्ये भेटल्या होत्या. ही कंपनी कपडे, ताग आणि फूटवेअरची आयात आणि उत्पादन करते. शिवाय कंपनी इतर कंपन्यांसोबत सहयोग करत नफा शेअर करते. आशिष लता यांनी महाराज यांना सांगितलं होतं की, त्यांनी तीन कंटेनर ताग दक्षिण आफ्रिकेत आणला आहे. आयात आणि सीमा शुल्क माफ करण्यासाठी त्यांना पैशाची गरज असल्याची बतावणी त्यांनी महाराज यांच्याकडे केली होती. यासंबंधीचे खोटी कागदपत्रेही त्यांनी महाराज यांना दाखवले.
रामगोबीन यांचा परिवार विश्वासू आणि प्रतिष्ठित असल्याने आणि नेट केअर डॉक्युमेंट मिळाल्याने महाराज यांनी आशिष लता यांच्यासोबत करार केला. पण, काही काळात सत्य समोर आलं. त्यानंतर महाराज यांनी आशिष लता यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, आशिष लता स्वत:ला पर्यावरणविषयक आणि राजकीय रस असणाऱ्या कार्यकर्त्या मानतात. महात्मा गांधींचे अनेक वंशज सामाजिक कार्यकर्ते म्हणून दक्षिण आफ्रिकेत काम करत आहेत.