(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या रुशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलीत उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात स्तनदा मातांना खजूर पॅकेटचे वाटप करण्यात आले.
स्तनदा मातांच्या आरोग्याचा विचार लक्षात घेता कोरोना कालीन परिस्थितीत त्यांना मदत करणे गरजेचे झाले आहे. या पडत्या काळात त्याच्या शारीरिक आरोग्यात भर पडण्यासाठी रक्तची वाढ आणि आवश्यक लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी खजूर हा उत्तम पर्याय म्हणून गणला जातो. माता स्तनदा अवस्थेत असतांना त्यांना असणाऱ्या या गरजा लक्षात घेऊन हा उपक्रम राबवला गेला असल्याचे हर्षाली चौधरी यांनी सांगितले.
उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातर्फे कोरोना काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने आज संस्थेतर्फे छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात स्तनदा मातांना खजूर पॅकेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, चेतन वाणी, विनोद शिरसाळे, धनराज कासट, सागर मुंदडा, अंकिता मुंदडा उपस्थित होते.