(राजमुद्रा वृत्तसेवा) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून राज्याशी संबंधित अनेक मुद्यांवरही चर्चा केली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणदेखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता सुरु झालेली ही बैठक जवळपास दीड तास सुरु होती. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात वैयक्तिक भेट झाल्याचीही चर्चा होती. भेटीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांना मी काही नवाज शरीफ यांच्या भेटीसाठी गेलो नव्हतो असं उत्तर दिलं.
उद्धव ठाकरे यांना मोदींसोबत तुमची वैयक्तिक भेट झाली का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी ही गोष्ट कधी लपवलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही, पण याचा अर्थ नातं तुटलं असा नाही. त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचं नाही. मी काही नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो. माझ्या सहकाऱ्यांना आत्ताही मी पुन्हा जाऊन त्यांना भेटायचं आहे असं सांगितलं तर त्यात चुकीचं काय?,” अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली
“मधल्या काळात त्यांचा फोन आला आणि सरकार चांगलं काम करत आहे सांगितलं हे व्यक्तिगत बोलणच होतं. आजही आमची वैयक्तिक भेट झाली. यावेळी त्यांनी विचारपूस केली. मी त्यांना सहकाऱ्यांसोबत आलो असून राज्याचे प्रश्न आहेत असं सांगितलं,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. युती का तुटली ? असं विचारलं असता दीड वर्षाने त्यावर उत्तर का द्यावं असं ते म्हणाले.