(राजमुद्रा वृत्तसेवा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी देशवासीयांसी संवाद साधताना १८ ते ४४ वयोगटासाठी देखील केंद्र सरकारच मोफत लसपुरवठा करणार असल्याचं जाहीर केलं. पंतप्रधानांनी ही घोषणा करण्याआधी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे लसीकरणाविषयीची सविस्तर माहिती न्यायालयासमोर सादर करण्याचे निर्देश दिले होते. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या खंडपीठाने केंद्र सरकाच्या लसीकरणाच्या मोहिमेवर परखड शब्दांमध्ये ताशेरे ओढले होते. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर एका शेरच्या माध्यमातून सूचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. तसेच, या ट्विटमध्ये त्यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड यांना देखील हॅशटॅग केलं आहे. त्यामुळे लसीकरणाच्या मुद्द्यावरून न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी केंद्र सरकारवर परखड शब्दांत टिप्पणी केल्याचा या ट्विटला संदर्भ असल्याचं बोललं जात आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आज एक शेर ट्वीट केला आहे. “जिंदा लाशों से तो अच्छी थी वो तैरती लाशें, जो मरने के बाद भी सिस्टम को नंगा कर गई | #JusticeChandrachud”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
गंगा नदीकिनारी काही दिवसांपूर्वी शेकडो मृतदेह सापडले होते. जितेंद्र आव्हाडांचा या शेरमधील रोख त्याच दिशेने असल्याचं बोललं जात आहे. उत्तर प्रदेशात बलिया, गाझियाबाद यासह गंगेच्या काठावर असलेल्या विविध घाटांच्या ठिकाणी मृतदेह वाहून येत असल्याचं निदर्शनास आलं होतं. यावरून मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील सरकारवर टीका झाली. त्यानंतर प्रशासनाने हे मृतदेह बाहेर काढण्याचं आणि नदीत मृतदेह टाकले जाणार नाही, यासाठी खबरदारी घेण्यास सुरूवात केली. तसेच, न्यायालयाने देखील उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांना हे मृतदेह तात्काळ हटवण्याचे आदेश दिले होते.