जळगाव राजमुद्रा दर्पण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या दोन उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचा समावेश आहे. संपूर्ण राज्यात एकनाथ खडसेंना विधानपरिषदेची निवडणूक लढवण्याची संधी देण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, त्याचसोबत नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्याची चर्चा सुरु होती. त्यामुळे जेष्ठ नेते एकनाथराव खडसेंना संधी देणार की नाही यासंदर्भात विविध चर्चा सुरू होत्या. पण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
येत्या 20 जूनला विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बऱ्याच महत्त्वाच्या राजकीय गोष्टी घडताना दिसत आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचा कठोर राजकीय प्रवास शिगेला आल्याचे दिसून येत आहे.
पक्ष प्रमुख जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून निंबाळकर आणि खडसेंची उमेदवारी जाहीर केली .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या विधानपरिषद निवडणुकीसाठी श्री. रामराजे नाईक निंबाळकर आणि श्री. एकनाथराव खडसे हे उमेदवार असतील. दोन्ही उमेदवार विजयी होऊन महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहतील, असा आम्हाला विश्वास आहे. @NCPspeaks
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 9, 2022