(राजमुद्रा वृत्तसेवा) जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे जमावाच्या जबर मारहाणीत मृत्यू झालेल्या वायरमन गजानन राणे यांचे पुत्र शुभम राणे यांच्याशी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दूरध्वनी द्वारे आज संपर्क साधून सांत्वन केले आहे. तसेच जमावाच्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे यांच्याशीही ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी संवाद साधून दिलासा दिला.
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे जमावाच्या जबर मारहाणीत वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू आणि उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे जखमी होण्याच्या घटनेची दखल
ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून घेतली आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून राणे यांचे सुपुत्र शुभम राणे यांच्याशी फोनवर बोलून त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न उर्जामंत्र्यांनी केला आहे. राणे कुटूंबाला शक्य ती सर्व मदत केली जाईल असे आश्वासनही राऊत यांनी दिले.
उप कार्यकारी अभियंता धामोरे यांच्याशीही फोनवर संवाद साधून दिलासा दिला आहे. राऊत यांच्याशी बोलताना धामोरे यांनी सर्व सबस्टेशनवर सीसीटीव्ही लावण्याची विनंती केली केली असून त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, तसेच पीडित कुटुंबाची भेट घेऊन या विषयावर प्राथमिक माहिती घेण्याच्या व पुढील कारवाई करण्याच्या सूचना महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना दिले आहेत. ते लवकरच महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडखे यांना जळगावमध्ये पाठवणार आहेत.
पिडीत कुटुंबातील सदस्य आणि सर्व संबंधितांशी बोलून ते आपला अहवाल उर्जामंत्र्यांकडे सादर करतील. हा अहवाल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सादर करून या प्रकरणी सखोल तपासासाठी विनंती करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांना आवश्यक त्या सूचना देण्याची विनंतीही करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली.