(धुळे राजमुद्रा वृत्तसेवा) कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन पालक गमावलेल्या बालकांच्या मदतीसाठी, पुनर्वसनासाठी धुळे जिल्ह्यातील सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 20, तर एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 195 एवढी आहे. या पालक गमावलेल्या बालकांचे सर्वेक्षण जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशी बालके व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला असता शिक्षण, निवारा, उदरनिर्वाह आणि रोजगाराची उपलब्धता हे मुद्दे प्रामुख्याने त्यांना भेडसावत आहेत. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी आर्थिक मदतीची घोषणा राज्य शासनाने केली आहे. तसेच ही बालके व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असून याबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश महसूल, महिला व बालविकास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीयकृत बँकांना दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर ‘कोविड- 19’ मुळे एक किंवा दोन पालक गमावलेली बालके व त्यांच्या कुटुंबीयांसाठी धुळेकरांनी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पुढे यावे असे आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
ही बालके व कुटुंबांना प्रामुख्याने शालेय गणवेश, शालेय साहित्य, शालेय व महाविद्यालयीन शैक्षणिक शुल्क, शिक्षण पूर्ण होईपर्यंतचा खर्च, किराणा, अन्नधान्य, उदरनिर्वाहासाठी रोजगार आदींची तातडीने आवश्यकता असल्याचे त्यांच्याशी केलेल्या संवादावरून लक्षात येते. त्यांच्या मदतीसाठी धुळेकर दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनांनी सामाजिक दायित्वाने मदत करावी असेही यादव यांनी सांगितले. सोबतच सदर बालके व त्यांच्या कुटुंबीयांना मदत करावयाची असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी (५२, जयहिंद कॉलनी, सुधा हॉस्पिटलसमोर, देवपूर, धुळे, दूरध्वनी : 02562- 224729) येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.