जळगाव राजमुद्रा दर्पण | राज्यसभा निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल,अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक हे तिन्ही उमेदवारांना घवघवीत विजयी मिळाला. महाविकास आघाडील 11 मतांचा झटका देत भाजपने तिसरी आणि सहावी धोक्याची जागा जिंकली. या विजयाच्या मुंबईत जल्लोष पाहायला मिळाला. नंतर आणखी एक जल्लोष आज दुपारी जळगावमध्ये बघायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी पैजा देखील लागल्या होत्या.
भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे सहाय्यक PA अरविंद देशमुख यांनीही 1 लाख रुपयांची पैंज लावली होती आणि ती पैंज स्वीकारण्याचं खुलं आव्हान त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले होते.अरविंद देशमुख यांनी लावलेली पैंज कोणं स्वीकारणार अशी सर्वत्र चर्चा होती .
त्याचवेळी देशमुख यांची ही पैंज राष्ट्रवादी काँग्रेसने स्वीकारली. जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील यांनी अरविंद देशमुख यांची पैंज स्वीकारली. त्यांनी महाविकास आघाडी कडून चारही उमेदवार निवडून येईल असा दावा केला होता. त्यामुळे ही एक लाख रुपयांची पैंज कोण जिंकणार याकडे लक्ष लागून होते.
आज पहाटे 4 वाजता राज्यसभेचा निकाल जाहीर करण्यात आला. ज्यात महाविकास आघाडीचे संजय पवार पराभूत झाले असून भाजपचे धनजंय महाडीक यांचा विजय झाला. म्हणजेच अरविंद देशमुख यांनी दिलेली पैज जिंकली. दिलेल्या शब्दानुसार, राहुल पाटील यांनी आज दुपारी 1 वाजता 1 लाख रुपयांचा चेक आमदार गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अरविंद देशमुख यांच्या कडे सोपवण्यात आला. मात्र देशमुख यांनी हा चेक स्वीकारला नाही, त्यांना तो परत केला व पैंज च्या विजयाचा केवळ एक रूपया त्यांनी घेतला.
यासंदर्भात बोलताना अरविंद देशमुख म्हणाले की, प्रश्न पैशांचा नव्हताच, मात्र आमचे नेते गिरीश महाजन यांच्यावर आमचा विश्वास होता आणि तो खरा ठरला. तर राहूल पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोबत कार्य केले, तसेच आमचे नेते अजित पवार यांच्यासह सर्व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या जोरदार प्रयत्नामुळे संजय पवार निवडून येतील असा अतूट विश्वास होता. परंतु भाजपला यश मिळाले, आम्ही भाजपचे अभिंनदन करीत आहोत. ही पैज हरल्यामुळे आम्ही एक लाख रूपये रकमेचा चेक दिला परंतु देशमुख यांनी मोठ्या मनाने तो स्विकारला नाही.