(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) केरळहून महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून आता अधिक वेगाने पुढे सरकत असून आज जोरदार पावसाने मुंबईत हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत मान्सूनचे आगमन झाले आहे. रात्रीपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. अद्यापही अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु होती मात्र आता पावसाचा जोर वाढला आहे. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याच देखील सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रासह मुंबई आणि इतर भागात मंगळवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मुंबईत रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून आज मान्सूनचे मुंबईत आगमन झाले आहे. मुंबईत मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरवर्षी साधारणपणे १० जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होत असते. मात्र यावेळी त्याआधीच मुंबईत मान्सून दाखल झाला आहे अशी माहिती आयएमडी मुंबईचे उपमहासंचालक (डीडीजी) डॉ. जयंत सरकार यांनी दिली आहे.
गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये, विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. मंगळवारी कुलाबा वेधशाळेने यासंदर्भात माहिती दिली होती. मान्सूनसाठी अनुकूल असं वातावरण आता निर्माण झाल्याचं देखील कुलाबा वेधशाळेनं स्पष्ट केलं होते.