जळगाव राजमुद्रा दर्पण | – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी कृषिमंत्री असतांना शेतकऱ्यांना कमी खर्चात सेंद्रिय शेती करून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल ? याकरिता संशोधन करण्यासाठी त्यांच्या शेतात पांढरे जांभूळ , पिवळी खजूर , चिकू , मोसंबी आदी फळांची लागवड केलेली होती . सदर प्रयोग यशस्वी झालेला असुन त्यांच्या शेतातील पिवळी खजूर आज जळगावात विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील काही गरजू कार्यकर्त्यांना रोजगार मिळावा याहेतूने जळगाव शहरात 10 ठिकाणी खजूर विक्री केली जाणार आहे . या खजुराचे बाजारमूल्य 400 रुपये किलो असले तरी कार्यकर्त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी निम्मे किमतीत म्हणजेच फक्त 200 रुपये किलो प्रमाणे खजूर विक्री करण्यात येणार आहे . आज दुपारी चिमुकले राम मंदिर जवळ खजूर विक्री स्टॉल चा शुभारंभ करण्यात आला . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी , अमोल कोल्हे , भगवान सोनवणे , रिकू चौधरी , रहीम तडवी , सुशील शिंदे , नईम खाटिक , संजय जाधव , धवल पाटिल , राहुल टोके , हितेश जावळे उपस्थित होते . लवकरच अजिंठा चौफुली , काव्यरत्नावली चौक , टॉवर चौक , कोर्ट चौक यासह विविध बाजार परिसरांत 9 स्टॉल लावण्यात येणार आहेत . या खजुरांची चव साखरेप्रमाणे मधुर असून किंमत देखील कमी आहे तसेच सेंद्रिय शेतीतून पिकलेल्या या खजूरांमध्ये रासायनिक प्रक्रिया न झाल्यामुळे ग्राहक देखील समाधानी आहेत व त्यामुळेच या खजूर विक्री स्टॉलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे . यापूर्वी लाल खजूर बाजारात उपलब्ध होते पण हे पिवळे खजूर नागरिकांना कुतूहलाचा विषय ठरत आहे . कार्यकर्त्यांना देखील यामाध्यमातून काही प्रमाणात आर्थिक मदत मिळणार असल्याने कार्यकर्त्यांनी देखील याविषयी सकारात्मकता दाखवली आहे व एखाद्या नेत्याने याप्रकारे रोजगार मिळवुन दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे .