जळगाव राजमुद्रा दर्पण | राज्यात राज्यसभा, विधानपरिषदेत भाजपाने जशी ताकद लावली अगदी त्याच पध्दतीने जिल्ह्यातील नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत रणधुमाळी रंगणार आहे, त्याचे कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा आमदार कोण, हे याच निवडणुकीनंतर ठरणार आहे.
जळगाव विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांची ऑक्टोबर 2022 अखेर मुदत संपत आहे. त्याआधी एक महापालिका, 14 नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत जे सदस्य निवडून येतील, तेच विधान परिषदेसाठी मतदान करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा यांच्यात काट्याची टक्कर प्रत्येक प्रभाग, गट आणि गणात पहायला मिळणार आहे. यावेळेस सर्व पालिका आणि जिल्हा परिषदेची रचना नव्याने झाल्यामुळे सदस्यांची संख्या वाढली आहे. मतदारसंघाची रचना बदलली आहे. त्यामुळे सर्वांनी आरक्षण पाहून कामाला सुरवात केली आहे.
जिल्ह्य़ात जिल्हापरिषद 77,पंचायत समिती 15 आणि महापालिका व नगरपरिषद 602 असे एकुण 694 सदस्य नव्याने निवडून येतील आणि तेच आमदार ठरवतील.
जिल्ह्यात जळगाव महापालिका, जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती आणि भुसावळ, अमळनेर, पाचोरा, चोपडा, चाळीसगाव, जामनेर, यावल, रावेर, फैजपूर, सावदा, पारोळा, एरंडोल, धरणगाव, वरणगाव, भडगाव, मुक्ताईनगर, शेंदुरणी, बोदवड, नशिराबाद या पालकांची निवडणूक होऊ घातली आहे.