(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) भाग्यदीप म्युझिक प्रस्तुत आगामी ह्रदय स्पर्शी ‘देवा रं..’ या गाण्याच्या टिझरचे आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. शेतकरी आत्महत्या या गंभीर मात्र संवेदनशील विषयावर या गाण्याची निर्मिती करण्यात आली असून त्यांच्या भावना समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक प्रदीप भोई यांनी केला आहे.
भाग्यदीप म्युझिक निर्मित ‘देवा रं…’ या गीतात बळी राजाच्या जीवनावर आधारित शेतकरी आत्महत्या या विषयाला हात घालत शेतकऱ्यावर होणारे अन्याय, त्यांची होणारी पिळवणूक, त्रास या गोष्टी दिग्दर्शक प्रदीप भोई यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या गीताचे चित्रीकरण धनवड या ठिकणी एका तांड्यामध्ये केले आहे. गीताचे चित्ररेखाटन सौभाग्य सेनापती व गौरव मोरे यांनी केले असून या गीताचे संकलन योगेश ठाकूर यांनी केले आहे. तसेच सहायक दिग्दर्शक म्हणून कुणाल पाटील आणि विभावरी मोरणकर यांनी काम पाहिले. गाण्याचे गीतकार शुभम कुलकर्णी व संगीत श्रीनिवास मोढे (अमरावती) हे आहेत, तर गीत गायन आकाश साठे (पुणे) यांनी केले आहे.
गाण्यामध्ये मुख्य स्त्रीभूमिका निशा तायडे यांची असून पुरुष भूमिकेमध्ये अक्षय राजपूत, चारुदत्त पाटील, सचिन कापडे, गौरव मोरे व बाल कलाकार म्हणून जश शहा हा चिमुरडा दिसून येईल. गीताची मुख्य कहाणी ही शेतकरी आत्महत्या या विषयाला वाचा फोडणारी आहे. बळीराजा आपल्या देशाचा पोशिंदा आज खस्ता खाऊन मरत आहे, संपूर्ण जगाला दोन वेळेच अन्न खाऊ घालणारा आज उपाशी पोटी राहून मृत्यू पावतोय हा महत्वाचा विषय या गीताच्या मार्फत दिग्दर्शक प्रदीप भोई यांनी समाजासमोर मांडला आहे.
सदर गीत लॉंच करत असताना राष्ट्रवादी जिल्हा सांस्कृतिक विभाग अध्यक्ष गौरव लवंगले, उपाध्यक्ष विभावरी मोरणकर, दिग्दर्शक प्रदीप भोई, सौभाग्य सेनापती, गौरव मोरे, योगेश ठाकूर, अक्षय राजपूत, निशा तायडे, प्रांजल पंडित, संदीप मोरे, चारुदत्त पाटील उपस्थित होते.
गीताला विशेष सहकार्य म्हणून बंधन प्रोडक्शन, माय टी म्युझिक, दक्षराज प्रोडकशन, अरविंद एंटरटेनमेंट, दुनियादारी प्रोडक्शन, राजस प्रोडक्शन, ड्रीम स्टुडियो, मनोधेर्या फाउंडेशन, ईश्वर हिरे, राहुल पाटील, संदीप मोरे आदींनी सहकार्य केले. लवकरच हे गीत नागरिकांच्या भेटीला येणार असून, सर्वांनी भाग्यदीप म्युझिक या युट्युब चॅनलला जाऊन या गीताचा आस्वाद घ्यावा, अशी विनंती सर्व भाग्यदीप म्युझिकच्या संपूर्ण टीम तर्फे करण्यात आली आहे.