(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकनाथराव खडसे आज जळगाव राष्ट्रवादी कार्यालयात उपस्थित होते. वर्धापन दिनाच्या सांगतेनंतर पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली. सध्या दूध संघाच्या विषयावर बरेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या संदर्भात एकनाथ खडसे यांना विचारणा केली असता त्यांनी ही घोटाळ्याची होणारी चर्चा तथ्यात्मक नसल्याचे सांगितले.
जळगाव जिल्हा दूध संघाने जी नोकरभरती सुरू केली आहे ती शासकीय मान्यतेनुसार करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून त्यात घोटाळा होण्याचा काही संबंध नाही, आणि असं जर विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी ते निदर्शनास आणून स्पष्ट करून दाखवावे असे नाथाभाऊ प्रतिउत्तरात म्हणाले.
भरती प्रक्रिया अजून झालेली नाही, मात्र जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की दूध संघामध्ये ज्यांनी अनुभव घेतलेला आहे, ज्यांनी वर्षानुवर्ष काम केलेले आहे अशा अनुभवी लोकांना प्राधान्य दिले जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये कोणालाही पैसे देण्याची गरज नसून जर कोणी याबाबत पैसे मागत असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल करावी असेही खडसे म्हणाले.
जळगाव जिल्हा दूध संघाचे माजी मुख्य सुरक्षा अधिकारी एन जी पाटील यांनी ही प्रक्रिया एक मोठा भ्रष्टाचार असून, यात भरती करून घेण्यात येणाऱ्या लोकांची यादी कालच जाहीर केलेली आहे. ते सर्व लोक दूध संघा मध्ये काम करणारे असून त्यांना या परीक्षेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. असे खडसे यांनी स्पष्ट केले. मात्र यामध्ये ‘या कर्मचाऱ्यांनी ही ऑनलाईन परीक्षा पास होणे गरजेचे आहे’ अशी एक अट अशी ठेवण्यात आली आहे. या परीक्षेत पास झालेल्यांनाच भरती केले जाणार आहे. याबाबत कोणतेही नियम बाह्य काम होणार नसून याबाबतच्या सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत. असेही ते म्हणाले.
एन जी पाटील यांच्या संदर्भात बोलताना खडसे म्हणाले की हे आरोप प्रत्यारोप करणारे पाटील हे दूध संघातील बडतर्फ कर्मचारी असून त्यांनी हा घोटाळा सिद्ध करून दाखवावा. सध्या फक्त भरतीची अर्ज प्रक्रिया चालू असून पाटील हे भरती होण्यापूर्वीच 30 कोटींचा घोटाळा होत असल्याचे सांगत आहेत. जर असे असेल यर त्यांनी हे सिद्ध करावे . त्यामुळे आधी मूल जन्माला येऊ द्यावे त्यानंतर ते कळेल तो काळा की गोरा असेही नाथाभाऊ म्हणाले. सदर भरती प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार होत असेल तर त्यांनी पोलीसात तक्रार दाखल करावी. याबाबत आपण स्वतः पोलिसांना याबाबतीत मदत करण्याचे आव्हान करू असेही नाथाभाऊ म्हणाले.