(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या घंटा गाड्यांमध्ये ओला कचरा व सुका कचरा अशा दोन प्रकारच्या व्यवस्थेसोबतच घरातील अन्नपदार्थ विशेषतः पोळ्या व अन्न अशा खाद्य पदार्थांची वेगळी सोय करून त्याचा गुरांसाठी वापर होण्यास संदर्भात विचार करण्यात यावा या आशयाचे अर्जपत्र रिद्धी जान्हवी फाउंडेशन अंतर्गत चित्रलेखा मालपाणी यांच्यातर्फे आयुक्त सतीश कुलकर्णी यांना देण्यात आले.
घंटागाडीमध्ये ओला कचरा व सुका कचरा अशा प्रकारची कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असली तरी, खाद्य पदार्थ तसेच अन्न हे याच कचऱ्यामध्ये टाकले जाऊन अन्नाची नासाडी होत आहे. मात्र हे अन्न वेगळ्या बकेटमध्ये घंटा गाडीतच ठेवल्यास याचा वापर गुरांसाठी अन्न म्हणून केला जाऊ शकतो. असे या अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पाची दखल घेतली गेल्यास याची लोकांमध्ये जनजागृती रिद्धी जान्हवी फाउंडेशनतर्फे करण्यात येईल असे आश्वासन अर्जात देण्यात आले आहे. जळगावात हा प्रकल्प राबवला गेल्यास महाराष्ट्रातील हा पहिला उपक्रम होईल असेही यात नमूद करण्यात आले आहे.