जळगाव राजमुद्रा दर्पण | संपूर्ण राज्यात शिवसेनेतून बंडखोरी झाल्यानंतर राजकीय आहाकार माजला आहे. असे असताना जळगाव शहरात नाराजीचा सूर उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शिवसेनेच्या समर्थनात पोस्टरबाजी करायला सुरुवात केली आहे. यामध्ये “शिवसेना ही बाळासाहेबांची…डुप्लिकेटांची नाही..” असे ठळक मजकूर लिहिलेले बॅनर शहरातील मुख्य चौकांमध्ये लावण्यात आलेले आहे. बॅनर वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे, तसेच निषेध करणाऱ्या काळ्या पट्ट्यात एकनाथ शिंदे तसेच आनंद दिघे यांची धर्मवीर चित्रपटात भूमिका निभावणाऱ्या प्रसाद ओक यांचा फोटो आहे. ठिकाणी लावण्यात आलेल्या या बॅनरने शहरातून रस्त्यावर येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मुंबई तसेच राज्यातल्या विविध भागात एकनाथ शिंदे यांना समर्थन देणारे बॅनर त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेतील काही कट्टर नेते देखील शिवसेना तसेच उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे समर्थन करण्यासाठी सरसावले आहे. यातच शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी जळगाव शहरामध्ये बॅनरबाजी करीत लक्ष वेधून घेतले आहे. एकनाथ शिंदे व धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारे प्रसाद ओक यांचे फोटो निषेध करणाऱ्या काळ्या पट्ट्यावर टाकण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांचा शहरात लावल्या बॅनर च्या माध्यमातून निषेध करण्यात आला आहे.
संपूर्ण राज्यातील शिवसेनाही फुटीच्या उंबरठ्यावर आहे. अनेक नेते खासदार आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गुवाहाटी येथे सामील होत आहे यामुळे शिवसेनेतील काही नेत्यांचे देखील मानसिक खच्चीकरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कालच शहरातील टॉवर चौकामध्ये शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांना परत येण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले आहे. अनेक शिवसैनिकांना यावेळी अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात शिवसैनिकांकडून दिलासादायक वातावरण तयार होण्यासाठी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती.
गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या धरणगाव मध्ये यांच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. बंडखोरांना शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देखील यावेळी कट्टर शिवसैनिकांकडून देण्यात आले आहे. यासोबतच या आंदोलनामध्ये सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी देखील सहभाग नोंदवल्याने जिल्ह्याभरात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. जळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री असलेले पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक असलेले मंत्री गुलाबराव पाटील यांचा पुतळा त्यांच्याच जिल्ह्यात जाळला गेल्याने शिवसेनेत देखील संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.