जळगाव राजमुद्रा दर्पण (कमलेश देवरे) | राज्यात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्यामुळे अस्वस्थ निर्माण झाली आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वतः मैदानात उतरून बंडखोरानविरोधात खिंड लढवावी लागणार आहे.
यामध्ये भाजपचा मोठा गनिमी कावा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या सर्व घडामोडींचा मोठा प्रभाव जळगाव जिल्ह्यावर पडणार आहे यामुळे जळगाव जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहेत नुकतेच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजकीय प्रवाहातून बरेच दिवस थांबलेले राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा विजय झाला मात्र अल्पमतात आलेल्या सरकार यामुळे खडसेंची मंत्रिपदाची उपेक्षा होण्याची शक्यता आहे.जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे चार आमदार तर एक अपक्ष बंडखोरांच्या गळाला लागले आहेत यातच या राजकारणाचा प्रभाव अनेकांचा राजकीय संसार थाटणारा असून तर अनेकांचा उध्वस्त करणार आहेत.
सर्वाधिक राज्यभरात कट्टर शिवसैनिक म्हणून पान टपरी ते थेट राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून ओळख मिळवलेले गुलाबराव पाटील काही दिवस शिवसेनेतील बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. ठाकरे माझे इंजन असून मी त्यांचा डब्बा आहे. असे देखील त्यांनी पक्ष नेतृत्वावर स्तुतिसुमने वाहिली होती. मात्र याच्या विपरीत म्हणजे मंत्री गुलाबराव पाटील देखील दुसऱ्याच दिवशी गुवाहाटी येथे शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले गेले. कट्टर शिवसैनिक म्हणून गुलाबराव पाटलांनी ओळख मिळवली मात्र सत्तेच्या हव्यासापोटी गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेसोबत दगाबाजी केली असा थेट आरोप जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केला आहे. शिवसेनेमध्ये गुलाबराव पाटील यांचे अनेक निकटवर्तीय सक्रिय असून त्यांनी या विषयावर चुप्पी साधली आहे.
मात्र गुलाबराव पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या जळगाव ग्रामीण भागात त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा देखील मोठा प्रभाव मानला जातो. राज्यात घडत असलेल्या घडामोडींमध्ये जर शिंदे गटाला भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यात यश आले तर पाटलांच्या मतदारसंघातून मंत्री पदापर्यंत गेलेले गुलाबराव देवकर यांचा महाविकास आघाडी संपुष्टात आल्यास त्यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे गेल्या अनेक दिवसापासून भाजपने माझ्यावर मोठ्याप्रमाणात अन्याय केला यामध्ये सर्वाधिक खेळ हा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केला त्यांच्यामुळेच माझे राजकीय हरण झाले असा देखील त्यांनी आरोप केला होता. मात्र राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी त्यांचे नाव देण्यात आले मात्र राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील नावांवर शिक्कामोर्तब करण्यास नकार दिला व तो प्रस्ताव फेटाळून लावल्याचे देखील सांगितले जाते. मात्र फायरब्रँड नेते असलेले खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत विधान परिषदेच्या सभागृहात आणायचे म्हणून विधान परिषदेच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागेवर खडसे यांना उमेदवारी देण्यात आली यामध्ये खडसे विजय देखील झाले मात्र शिवसेनेतील बंडखोरीमुळे सरकारच व्हेंटिलेटरवर असल्यामुळे राष्ट्रवादी विरोधात बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या विजयानंतर खडसेंना गृहमंत्री अथवा राज्य उत्पादन शुल्क या विभागाचा मंत्री म्हणून पदभार मिळेल असे सांगितले जात होते, मात्र सरकारच्या अस्थिरतेमुळे खडसेंना मंत्री पदापासून वंचित राहावे लागते का ? याकडे देखील संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
शिवसेनेचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे समर्थक व निकटवर्तीय एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने त्यांनी आमदार किशोर पाटील यांना भरभरून निधी दिल्याचे सांगितले जाते. विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल पाटील यांनी किशोर पाटलांना विरोधात महायुती मधून बंड करीत उमेदवारी केली होती. काही फरकाने अमोल पाटील यांचा निसटता पराभव पाचोरा विधानसभेत झाला होता, किशोर पाटील अवघ्या थोड्या फरकाने विजयी झाले होते. पूर्वाश्रमीचे राजकीय श्रीमंती लाभलेले अमोल पाटील हेदेखील गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात किशोर पाटील हे शिंदे यांच्या गटात दाखल झाले आहे. त्यांच्याकडे आमदार सांभाळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे यांची सावली म्हणून ते काम पाहत आहे. मात्र शिंदे गटाच्या पाठिंब्याने भाजप राज्यात सत्तेत येण्याची शक्यता आहे यामुळे आगामी निवडणूक लढण्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन हे अमोल पाटील यांना नक्कीच बळ देतील हे निश्चित आहे. भाजपला राज्यात सत्तेत आल्यानंतर निसटता पराभव झालेल्या भाजपाच्या बंडखोर अथवा पक्षाने दिलेल्या उमेदवार यांना पुन्हा बळ देण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तसेच नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये किशोर पाटील यांची कोंडी गिरीश महाजन व अमोल पाटलांकडून होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील हे आधीपासूनच शिवसेनेत आहे. शिवसेनेत त्यांच्यावर मंत्रीपद न मिळाल्याने अन्याय झाल्याची भूमिका त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात शिंदे गटात बंडू परित करीत ते सामील झाले, यामुळे त्यांची मंत्रिपदाची राजकीय महत्वकांक्षा पूर्ण होते का हे देखील महत्त्वाचे करणार आहे. मात्र त्यांचे शिवसेनेतील अंतर्गत विरोधक मंत्री गुलाबराव पाटील हे वेळोवेळी विश्वासात घेत नसल्याची तक्रार त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केली होती मात्र त्यांचे पक्षात ऐकून घेतले जात नसल्याचे सांगितले जात होते. जिल्हाप्रमुख पदाच्या नियुक्ती प्रसंगी देखील त्यांना विश्वासात घेतले गेले नाही उलट शिवसेनेतील अंतर्गत विरोधकांकडून त्यांचे विधानसभेचे तिकीट कापले जाणार अशी चर्चा पसरवण्यात आली, यामुळे काही प्रमाणात गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात चिमणराव पाटील यांचे राजकीय खच्चीकरण झाले की काय ? हा सुद्धा सवालच आहे. म्हणूनच शिवसेनेतून बंडखोरी करीत ते शिंदे गटात सामील झाले, मात्र पारोळा नगरपालिकेचे नगराध्यक्ष असलेले करण पवार हे त्यांचे आगामी विधानसभेतील प्रतिस्पर्धी असल्याचे मानले जात आहे. भाजपकडून त्यांना अधिक बळ देऊन उमेदवारी देण्याची राजकीय शक्यता आहे त्यामुळे चिमणराव पाटील यांसारख्या बंडखोरांच्या पाठिंब्याने सत्तेत आलेली भाजप आगामी राजकारणात पारोळा मतदार संघाच्या आमदाराचे नाव बदलू शकते अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
चोपडा मतदार संघ कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा मात्र आजही चोपडा नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. याची सर्व सूत्रे ही विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्याकडे आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघ आरक्षित असल्याने अरुण भाईंची राजकीय महत्वकांशाना ब्रेक लागला मात्र त्यांनी राष्ट्रवादीत आपली कमान कायम ठेवली. शिवसेनेतील बंडखोरीमुळे चोपड्याचे आमदार लता सोनवणे त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे देखील एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहे. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय रणसंग्राम रंगण्याची चिन्हे चोपडा मतदारसंघात दिसू लागली आहे. अनेक जण चोपडा विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. लता सोनवणे यांनी शिवसेने विरोधात बंडखोरी केली याचा प्रचार- प्रसार करून अनेक जणांची राजकीय महत्त्वकांक्षा पल्लवीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुका सर्वच पक्ष स्वबळावर लढतील हे निश्चित आहे. आमदार लता – चंद्रकांत सोनवणे यांचे राजकीय विरोधक आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याची परिस्थिती चोपडा विधानसभा मतदार संघात आहे.
मुक्ताईनगर चा राजकीय संघर्ष संपूर्ण राज्यात परिचित आहे. मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता, मात्र त्यांनीदेखील शिंदे गटात जात मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला एकटे पडले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या समर्थनात गेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये खडसे समर्थक व शिवसैनिकांचा वाद विकोपाला गेला होता यामुळे अनेक आरोप-प्रत्यारोपाच्या फेर्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे व मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये झाडल्या गेल्या होत्या. मात्र खुद्द चंद्रकांत पाटील यांनी शिंदे गटात जाण्याची भूमिका घेतल्याने शिवसैनिक संभ्रमात आहे. पाटील यांच्याकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद आहे. अपक्ष लढून सुद्धा त्याच्या कडे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी कायम करण्यात आली. त्यामुळे संघटनेचा मुखींया असलेल्या व्यक्तीस सोडून गेल्याने स्थानिक शिवसैनिकांची सामाजिक व राजकीय कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे बंडखोर गटात आमदार पाटील सामील झाल्यामुळे त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंडखोरांच्या कोट्यातून त्यांना एखादे मोठे राज्यमंत्री दर्जाचे महामंडळ मिळण्याची शक्यता आहे. यामुळे चंद्रकांत पाटलांचं राजकारण अधिक स्थिर होणार आहे.त्याचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले आमदार एकनाथराव खडसेंच्या स्थानिक राजकारणावर याचा काय परिणाम होतो ? हे आगामी काळात समजणार आहे.