जळगाव राजमुद्रा दर्पण (कमलेश देवरे ) | राज्यात शिवसेनेत होऊ घातलेली बंडखोरी यामुळे राज्यात विविध भागात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे असे असताना जळगाव ग्रामीण मतदार संघातील आमदार तसेच मंत्री गुलाबराव पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्यानंतर जळगाव ग्रामीण या मतदारसंघात राजकीय परिणाम तसेच विविध चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी या भागाचे नेतृत्व केले आहे. पहिल्या टप्प्यात त्यांना राष्ट्रवादीकडून मंत्री पद देखील देण्यात आले होते. मात्र गेल्या अनेक दिवसापासून घरकुल घोटाळ्याच्या कायदेशीर कचाट्यात अडकलेले देवकर निवडणूक लढवू शकलेले नाहीत, यामुळे बराच काळ राजकीय प्रवाहातून त्यांना बाहेर राहावे लागले. मात्र जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदावर वर्णी लागल्यानंतर देवकर पुन्हा सहकाराच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले आहे. मंत्री गुलाबरावांच्या बंडखोरी ने जळगाव ग्रामीण मध्ये देवकरांचा गुलाब बहरतो का ? याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.
जळगाव ग्रामीण मध्ये मंत्री असताना कोट्यवधीचे निधी गुलाबराव देवकर यांनी तत्कालीन सरकारकडून मंजूर करून आणले होते. त्याचे अनेक अवशेष जळगाव ग्रामीण मतदारसंघात मोठ्या दिमाखाने उभे राहिलेले दिसतात, याचेच कारण म्हणून जळगाव ग्रामीण मध्ये आज देखील देवकरांची चर्चा नेहमी होत असते. मंत्री गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्यामुळे त्यांचा निषेध म्हणून आंदोलने तसेच त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जळगाव ग्रामीण चा बालेकिल्ला असलेल्या धरणगाव शहरात शिवसैनिकांकडून जाळण्यात आला. गुलाबराव पाटलांवर असलेल्या रोषाचा फायदा आगामी निवडणुकांमध्ये गुलाबराव देवकर यांना होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच बंडखोरी झाल्यावर देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष खंबीरपणे उभे टाकले गेले आहे. असे असतांना जळगाव ग्रामीण मध्ये देखील शिवसेना देवकरांना अंतर्गत रसद पुरवेल अशी राजकीय चर्चा जळगाव ग्रामीण मतदारसंघात रंगू लागली आहे.
देवकर हे भाजपाचे आमदार सुरेश भोळे यांना पर्यायी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कडून जळगाव शहरात लढवू शकतात असा एक कयास बांधला जात आहे. मात्र पूर्व बांधणी केलेला जळगाव ग्रामीण मतदार संघ देवकरांना फायदेशीर असल्याचे देखील सांगितले जात आहे. ग्रामीण भागात शिवसेनेला तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना शिवसेनेसोबत गुलाबराव पाटील यांनी गद्दारी केल्याची भावना ग्रामीण मतदार संघातून उमटत आहे. याबाबत जिल्ह्यातील अर्ध्याच्या वर शिवसेना जरी चुप्पी साधून असले तरी काही प्रमाणात गुलाबराव पाटलांवर अंतर्गत रोष वाढत असल्याचे चर्चा वेग धरू लागली आहे.
या सर्वाचा फायदा जळगाव ग्रामीण मतदार संघाचे पूर्वाश्रमीचे आमदार गुलाबराव देवकर यांना होणार हे निश्चित आहे. यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी सर्वात अगोदर जळगाव ग्रामीण मतदार संघ त्यांनी पिंजून काढला होता. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेच्या राजकारणावर देखील यामुळे मोठा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांची नाळ जुळलेल्या जिल्हा बँकेचे सर्व सूत्र हे गुलाबराव देवकर यांच्याकडे आहे. असे असताना ग्रामीण भागातला शेतकरी थेट त्यांच्या संपर्कात असून कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देवकरांची इनींग ग्रामीण भागातल्या शेतकर्यांना केंद्रबिंदू ठेवून होऊ शकते.