(राजमुद्रा वृत्तसेवा) उत्तर प्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना काहीसा वेग आल्याचं चित्र सध्या दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून या दोन्ही नेत्यांमध्ये तासभरापेक्षा अधिक काळ चर्चा झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी देखील योगी आदित्याथ यांची भेट होणार आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी योगी आदित्यनाथ हे पंतप्रधानांच्या निवास्थानी गेले असून या दोघांमध्ये उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय महत्वपूर्ण चर्चा झाली? याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. तसेच, करोना महामारीला तोंड देण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश आल्याचेही बोलले जात आहे. यावरून देखील योगी सरकारच्या कारभाराबाबत प्रश्न निर्माण केल जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरूवारी गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली व त्यांच्यात जळपास दीड तास चर्चा झाली. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीस आता वर्षभरापेक्षाही कमी कालावधी उरला असून भाजपाने आता संपूर्ण लक्ष पक्ष बळकटी करणावर केंद्रीत केल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला उत्तर प्रदेशच्या जनतेची नाराजी ओढावून घेणे परवडणार नाही. त्यामुळे या राजकीय हालचालींना वेग आल्याचेही बोलले जात आहे.
योगी आदित्यनाथ यांच्या या दिल्ली दौऱ्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये उलटसुटल चर्चांना सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशामधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नेतृत्वबदल होणार का?, योगी विरुद्ध मोदी असा काही वाद आहे का?, या दौऱ्यासंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात असले तरी सोशल नेटवर्किंगवर मागील काही दिवसांपासूनच सोशल नेटवर्किंगवर पंतप्रधान मोदी आणि योगींमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नेतृत्व बदलाबाबत सध्या तरी विचारात नाही, मात्र अन्य काही महत्वपूर्ण बदल केले जाऊ शकतात. भाजपाचे वरिष्ठ नेता बी. के. संतोष यांच्या नेतृत्वातील पथकाकडून जळवपास आठवडभरापूर्वी उत्तर प्रदेश सरकारबाबत आढावा घेण्यात आल्यानंतर आज पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्य़नाथ यांच्यात बैठक झाली. या भेटीच्या निर्णयाची उत्सुकता लागून आहे.