(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) मुळातच डबघाईला गेलेल्या जळगाव महानगरपालिकेने आपली उदारता दाखवत वॉटरग्रेस कंपनीला आधीच कचरा व्यवस्थापनासाठी वाहने विकत घेऊन दिलेली आहे. मात्र असे असताना त्या वाहनांच्या किरकोळ तसेच मोठ्या नुकसानीचा सोबतच दुरुस्तीचा खर्च वाटरग्रेस कंपनीने स्वतः करायचा असताना, “हा खर्च महानगरपालिका का करत आहे?” असा सवाल राष्ट्रवादी महानगरप्रमुख अभिषेक पाटील यांनी केला आहे. मुळातच करारनाम्यामध्ये ‘नुकसानीचा तसेच दुरुस्तीचा खर्च हा वॉटरग्रेस कंपनीने करायचा’ असे नमूद असताना ‘महानगरपालिका आपली उदारता वॉटरग्रेस कंपनीवर का दाखवत आहे’ असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
स्थाई समितीच्या ४ मे ला झालेल्या बैठकीच्या संविदेत मुद्दा क्र. ८ मध्ये सदरील वाहनांच्या लोखंडी कप्पे सुधारण्यासाठी १३९०० रु प्रमाणे ८५ गाड्यांच्या दुरुस्तीसाठी ११,८१,५०० रुपयांच्या खर्चाला मंजुरी देऊन सदरील कामे पूर्ण करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
सदरील वाहने आरोग्य विभागाने जी. एम. पोर्टलवरून खरेदी करत असताना कप्पे कसे असावेत ही गोस्ट लक्षात का आली नाही?, गाड्यांचा दुरुस्तीखर्च हा वॉटरग्रेस कडून का घेतला गेला नाही?, जळगावकरांनी भरलेल्या कराची अशीच उधळपट्टी मनपाकडून केली जाणार आहे का?, जळगाव महानगरपालिका वॉटरग्रेस वर इतकी मेहरबानी का आहे? असे प्रश्न अभिषेक पाटील यांनी उपस्थित केले आहेत.
“अश्या छोट्या छोट्या चोऱ्या करूनच यांचाही आकडा मागील घोटाळ्यासारखा तर होणार नाही ना?” असा खबळजनक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सोबतच ‘ज्या ज्या अधिकाऱ्यांची यास मूक संमती दिली होती त्यांच्याकडून या रकमेची वसुली का करण्यात येऊ नये?’ असेही ते म्हणाले.