(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जळगाव जिल्हा दुध संघातील बेकायदेशीर भरतीला तात्काळ स्थगिती देऊन गुन्हेगारांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी या संदर्भात जामनेर मधील चिंचखेडा बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पांडुरंग पाटील यांनी आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट देऊन लेखी निवेदन दिले.
कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाची कोरोना काळातही निवडणूक घेण्यात आली, मात्र अद्याप जळगाव जिल्हा दुध संघाची कोणतीही निवडणूक घेण्यात आली नसून कायदेशीर रित्या निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी. तसेच जिल्हा दूध संघातील चेअरमन तथा संचालकांनी घेतलेल्या कर्मचारी भरती प्रक्रियेची योग्य ती चौकशी करून बेरोजगार तरुणांना न्याय देण्यात यावा अशी मागणी या निवेदनात रविंद्र पाटील यांनी केलेली आहे.
दूध संघातील भरती प्रक्रियेत संचालक मंडळातील ठेकेदारांनी आपल्या काही मर्जीतील कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रुपये घेऊन आरक्षण कायद्याचा भंग करून अधिकार नसतानाही भरतीप्रक्रिया सुरू केली आहे. सोबतच संचालक मंडळाला संघाचे काळजी वाहू म्हणून कोरोना पार्श्वभूमीवर वाढ देण्यात आली असून, याबाबत नियमानुसार कारवाई करण्यात यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आरक्षण कायदा लागू असताना दूध संघाने दाखल केलेली याचिका हायकोर्टात औरंगाबाद खंडपीठासमोर न्यायप्रविष्ट आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये निवडून आलेल्या संचालक मंडळाचा कार्यकाळ ऑगस्ट २०२० मध्ये संपला. मात्र कोरोना महामारीमुळे निवडणुका घेतल्या गेल्या नाही. अशा प्रकारे भरती घेण्याचा कोणताही अधिकार नसताना बेकायदेशीर मार्गाने सदर भरती प्रक्रिया सुरू असून करोडोंचा घोटाळा केला जात असून अनुसूचित जाती-जमाती व अन्य जातींच्या उमेदवारांची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आलेला आहे.
या सदर प्रक्रिया संदर्भात योग्य ती कारवाई होऊन गुन्हेगार ठरलेल्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी याआधी ही काही सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदारांनी केली असून औरंगाबाद खंडपीठात या भरती प्रक्रियेची प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याबाबत योग्य ती चौकशी करण्याची मागणी रवींद्र पाटील यांनी केली आहे.