(जळगाव राजमुद्रा वृत्त्त्सेवा) “जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेत कोणत्याही प्रकारे शिवसैनिकांची गटबाजी नाही. संघटनेला बळ देण्यासाठी वेळोवेळी नवे चेहरे दिसतात. त्यानुसार त्यांना संधी दिली जाते. परीस्थितीनुसार संघटनेमध्ये बदल होऊ शकतो. मात्र ही गटबाजी नाही” असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी जळगाव येथे केले.
शहरातील हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले “शिवसेनेत मुळीच गटबाजी नाही, वेळोवेळी बदल मात्र झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रात आपण गेल्या दोन-तीन दिवसांपासून दौरा करीत आहोत. यादरम्यान संघटनेत व शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. संघटनेला बळ देण्यासाठी नवीन चेहरे आले आहेत. असे सांगून खासदार राऊत म्हणाले मध्यंतरी संघटनेला बळ देण्यासाठी आपण येणार होतो, परंतु कोरोना साथीमुळे परिस्थिती बिकट असल्यामुळे येऊ शकलो नाही. आता परिस्थितीत बदल झाला असून त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रात दौरा सुरू केला आहे.
आपल्याला आतापर्यंत नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांमध्ये चांगली परिस्थिती दिसून आली आहे, संघटना अधिक मजबूत होण्यासाठी शिवसेनेने, विशेष करून जळगाव जिल्ह्याने आतापर्यंत आमदार दिले आहेत. परंतु आता मात्र लोकसभा निवडणुकीत खासदार हा शिवसेनेचा राहणार असल्याचाची ग्वाही त्यांनी दिली. यासंदर्भात शिवसेनेचे नेते व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना ही भावना कळवणार असल्याचेही खा. राऊत यांनी सांगितले. कारण मुंबई-कोकण नंतर सर्वाधिक आमदार जळगाव जिल्ह्याने दिले आहेत. त्यांचे कार्य लक्षात घेता यापुढे खासदार देखील शिवसेनेचा राहणार आहे.
असंतुष्टांच्या प्रश्नावर बगल
दरम्यान खासदार राऊत यांना जिल्ह्यातील शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला याबाबत काही कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथे उपस्थित असलेल्या काही नेत्यांनी त्यांना भेटू दिले नाही. त्यामुळे खासदार राऊत यांना जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये असलेली गटबाजी आणि निष्ठावंत शिवसैनिकांवर झालेला अन्याय याबाबत संपूर्ण माहिती मिळू शकली नाही. त्याचप्रमाणे गटबाजीच्या प्रश्नावर खासदार राऊत यांनी अधिक बोलणे टाळले, आणि या प्रश्नावर मूग गिळून बसले.
नवीन कार्यकर्त्यांना सेनेत संधी देण्यात आली. त्यांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात उत्साहदेखील दिसून आला. परंतु जे निष्ठावंत शिवसैनिक, पदाधिकारी होते त्यांना मात्र कोणत्याही पदावर किंवा शासकीय समित्यांवर न घेतल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून आला आहे. त्यामुळे खासदार राऊत यांच्या दौऱ्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये जो उत्साह संचारला आहे तो कायम टिकून राहण्यासाठी आता पक्षप्रमुख काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.