भारत-पाकिस्तान सीमेवर आजकाल पाकिस्तानी ड्रोन अनेकदा दिसले आहेत. सांबा येथे रविवारी पुन्हा एकदा ड्रोन दिसले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमेजवळ हे ड्रोन दिसले. सांबा येथील मंगू चक गावातील लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सुरक्षा दलाने शोध मोहिमेसाठी ड्रोन तैनात केले आहे. गावकऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पथक त्या भागात पाठवण्यात आले आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले.’ गेल्या दोन आठवड्यात तिसऱ्यांदा पाकिस्तानी ड्रोन भारतीय सीमेजवळ दिसले आहे. यापूर्वी 4 जुलै रोजी राजपुरा भागात पाकिस्तान सीमेजवळ ड्रोन दिसला होता.
पठाणकोटमध्येही ड्रोन दिसले :-
पठाणकोटमध्ये पाकिस्तानी ड्रोन दिसल्याचे प्रकरणही समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बीएसएफच्या जवानांची नजर ड्रोनवर पडली. यानंतर जवानांनी गोळीबार सुरू केला. सुमारे 46 राउंड फायर करण्यात आले. यानंतर ड्रोन पाकिस्तानी सीमेवर परतले. या घटनेनंतर येथेही शोधमोहीम सुरू करण्यात आली.
पाकिस्तान हे ड्रोन हेरगिरीसाठी पाठवतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर दहशतवादी संघटनांकडेही ड्रोन असू शकतात आणि ते हल्ल्यापूर्वी माहिती गोळा करण्यासाठी ते पाठवतात, असेही संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, लष्कराच्या सतर्कतेमुळे ड्रोनला आतमध्ये फारसे शिरकाव करता येत नाही.