जळगाव राजमुद्रा दर्पण । येथील बॅरिस्टर निकम चौकातील सागर पार्क मैदानाची भाडेवाढ तब्बल वीसपट केल्यामुळे जळगावकर नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. क्रीडा विकासासाठी व खेळाडूंच्या शारीरिक विकासाचा विचार करून महापालिकेने महासभेमध्ये केलेली ही भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी मागणी शहरातील विविध 30 संस्थातर्फे मंगळवार दि. 19 जुलै रोजी दुपारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
प्रसिद्ध सागर पार्क मैदानावर शहरातील विविध सामाजिक आणि क्रीडा संघटना विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करीत असतात. यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांचे शारीरिक विकास होत असतात. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांना प्रतिनिधित्व करण्यासाठी विविध मैदानांवर सराव महत्त्वाचा असतो. यासाठी खेळाडूंना क्रीडांगणाचे फार मोठे महत्त्व आहे.
मागील काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने महासभेमध्ये सागर पार्क मैदानाचे एक दिवसाचे भाडेवाढ ही वीस पट वाढवून 25 हजार केली आहे. ही भाडेवाढ अन्यायकारक आहे. खेळाडूंना भेदभावाची वागणूक देऊन खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया विविध संघटनांची आहे. महासभेत ठराव मंजूर करताना महासभेने क्रीडा विकासाचा आणि खेळाडूंचा कुठल्याही प्रकारे विचार केलेला दिसून आलेला नाही.
तसेच सागर पार्क मैदानावर भाडेवाढ करताना तेथे कुठल्याही प्रकारच्या सुविधा पुरविलेल्या नाही. पत्रकार परिषदेत संघटनांनी मागणी केली की, सागर पार्क मैदानावर प्रेक्षक दालन, जनरेटर, वीज पुरवठा, पिण्याचे पाणी, फ्लड लाईट आधी सुविधा पुरविण्यात याव्यात. सागर पार्क मैदानाचे भाडे प्रतिदिन 2 हजार रुपये एवढेच आकारावे. महानगरपालिकेने खेळाडूंच्या सरावाकरिता मोफत क्रीडांगणासाठी जागा देखील उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या शहरातील विविध 30 क्रीडा संघटनातर्फे करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला राजपुताना प्रीमियर लीग, जैन प्रीमियर लीग, सुवर्णकार समाज क्रिकेट लीग, संत सावता माळी लीग, सागर पार्क क्रिकेट क्लब, सिविल इंजिनियर क्रिकेट क्लब, मराठा प्रीमियर लीग, लोहार स्पोर्ट्स, लेवा पाटीदार प्रीमियर लीग, गुजराती प्रीमियर लीग, जैन प्रीमियर लीग, बंजारा प्रीमियर लीग, गुजर प्रीमियर लीग, सिंधी प्रीमियर लीग, रोटरी बॉक्स क्रिकेट लीग, माहेश्वरी प्रीमियर लीग यांच्यासह विविध खेळाडू, पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.