जळगाव (प्रतिनिधी) : श्री संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेतर्फे अयोध्यानगर परिसरातून बुधवार, २७ जुलै रोजी सकाळी १० वाजता भक्तिमय वातावरणात भाविकांच्या जल्लोषात पालखी दिंडी काढण्यात आली. दिंडीत मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. समारोपावेळी कासार मंगल कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांचा हृदय सत्कार करण्यात आला.
श्री संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अयोध्यानगरातील संतोष इंगळे यांच्या अपना घर कॉलनी येथून दिंडीला सकाळी सुरुवात झाली. प्रारंभी पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक डॉ. विरेन खडके, नगरसेविका रंजना वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यानंतर दिंडी मार्गस्थ झाली. यावेळी श्री संत सावता माळी यांचा जयघोष करण्यात आला. दिंडीत सुरुवातीला भजनी मंडळातर्फे सुश्राव्य भजने सादर करण्यात आली.
संपूर्ण परिसरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दिंडी सिद्धिविनायक विद्यालय, राम मंदिर मार्गाने कासार मंगल कार्यालयात पोहोचली.
या ठिकाणी पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. याठिकाणी समाजातील जेष्ठ नागरिक आनंदीबाई सदाशिव महाजन, यशोदाबाई विठ्ठल महाजन, अनुसयाबाई महिपत इंगळे, रामकृष्ण विठोबा माळी, रामचंद्र थोरात, वसंत सुकदेव महाजन, तुळशीराम वारुळे, भगवान चौधरी यांचा सन्मान मान्यवरांनी केला. तसेच ग. स. सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मनोज अर्जुन माळी यांचा सत्कार मान्यवरांनी केला.
यशस्वीतेसाठी संतोष इंगळे, नंदू पाटील, सुभाष माळी, वामन महाजन, प्रशांत महाजन, जयंत इंगळे, शरद मोरे (माळी), दिलीप बागुल, संजय माळी, हेमंत महाजन, हर्षल इंगळे, कुलदीप थोरात, सुरेश माळी, निलेश माळी, बापू माळी, प्रमोद थोरात, सोमनाथ महाजन आदींनी सहकार्य केले.