(कोल्हापूर राजमुद्रा वृत्तसेवा) मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यापासून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, रायगडावरून त्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर पहिलं आंदोलन आज कोल्हापूरात होत असून, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या या ‘मूक आंदोलन’ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वंचित बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सहभागी झाले आहेत.
सुरुवातीपासूनच आंदोलन न करण्याची भूमिका घेणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांनी शिवराज्यभिषेक दिनी रायगडावरून आंदोलनाची तलवार उपसली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूरातून आंदोलनाला सुरूवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. हे मूक आंदोलन असणार असल्याचं त्यांनी नंतर स्पष्ट केलं होतं. आज पहिलं आंदोलन होत असून, सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. मूक आंदोलनात फक्त लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार) भूमिका मांडणार आहे
आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर “आजचं आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचं ऐकून घ्या,” असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीला केलं आहे. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडण्यास सुरूवात केली. दरम्यान, आंदोलनाला सुरुवात होण्याआधी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरातील आंदोलनस्थळी दाखल झाले. आंदोलनस्थळी प्रकाश आंबेडकर आणि चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाला पाठिंबा असल्याचं पत्र संभाजीराजे यांना दिलं.