जळगाव जिल्हा दूध संघातील संचालक मंडळ बरखास्त करून तेथे ११ जणांचे प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यासोबतच संघातील माजी सुरक्षा प्रमुख एन. जे. पाटील यांनी केलेल्या विविध तक्रारींची चौकशी करायला पाच अधिकाऱ्यांची समिती नेमल्याचे दोन स्वतंत्र आदेश दुग्ध विकास विभागाचे उप सचिव वि. भा. मराळे यांनी दिले आहेत. हे दोन्ही आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार काढल्याचा सुस्पष्ट उल्लेख आदेशात आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या मध्यस्थीतून आमदार गिरीश महाजन यांनी जिल्हा दूध संघाला लक्ष्य केले आहे. हे दोन्ही आदेश महाजन यांच्या पुढील कार्यवाहीची दिशा दर्शवते. जिल्हा दूध संघाच्या अध्यक्ष सौ. मंदाताई एकनाथराव खडसे होत्या. सौ. मंदाताई अध्यक्षपदी असतानाच ईडीने पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी प्रकरणी समन्स बजावले होते. तेव्हा सौ. मंदाताई यांनी काही काळ अध्यक्षपद सोडले होते. आज सौ. मंदाताई यांचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ बरखास्त करून ११ जणांचे प्रशासक मंडळ निरीहयुक्त झाले आहे.