(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटक शाखेतर्फे आज जिल्ह्यातील ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचे थकीत पगारासह विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना २१ एप्रिल २०२१ पासून शासनाकडून पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक हाल होत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या असून जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांना १० ऑगस्ट २०२० परिपत्रकानुसार एप्रिल पासून थकीत पगार देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना प्रथम ग्रामपंचायतीने पगार करावा म्हणून कायदा आहे, परंतु ज्या कर्मचाऱ्यांना सरकार मार्फत पगाराचे अनुदान मिळते त्या कर्मचाऱ्यांना पंचायतींचा हिस्सा व राहणीमान भत्ता देण्यास पंचायत शाखा दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कर्मचारी दुहेरी कोंडीत सापडले आहेत. तरी शासनाने त्यांना थकीत पगार अदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर विविध घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधले, तसेच शिष्टमंडळातील मान्यवरांचे यावेळी मनोगत व्यक्त करण्यात आले, कॉम्रेड तानाजी ठोंबरे, कॉम्रेड नामदेव चव्हाण, कॉम्रेड अमृत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.