यंग इंडिया लिमिटेडचे नॅशनल हेराल्ड कार्यालय जप्त करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपची खिल्ली उडवली आणि म्हटले की, भारतातील लहान आणि मध्यम व्यावसायिकांनी काही घडावे असे सत्ताधाऱ्यांना नको आहे. त्यांना फक्त बड्या उद्योगपतींच्या खिशात पैसा घालायचा आहे. वायनाडचे खासदार राहुल गांधी आज रात्री कर्नाटकातून दिल्लीला पोहोचणार आहेत. “कर्नाटकमध्ये लोकांमध्ये फूट पाडणे आणि द्वेष पसरवणे” यासाठी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी ही टीका केली.
यापूर्वी दिल्लीत ईडीच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत नॅशनल हेराल्ड कार्यालयातील यंग इंडिया लिमिटेडचा भाग जप्त केला होता. या संदर्भात ईडीने यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची तासन्तास चौकशी केली आहे. राहुल गांधी यांनी हुबळी येथे पत्रकार परिषदेत आरोप केला की, “त्यांना (भाजप) त्यांच्या दोन ते तीन आवडत्या मोठ्या उद्योगपतींनी तयार केलेले सर्व काही हवे आहे. त्यांचा संपूर्ण विचार लोकांच्या खिशातून पैसा काढून बड्या उद्योगपतींच्या खिशात टाकायाचा आहे.”
भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस एकवटली :-
2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस “संपूर्णपणे एकजूट” आहे, असे राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस सत्तेवर आल्यावर ते “स्वच्छ आणि प्रामाणिक” सरकार देईल जे राज्याच्या भविष्यासाठी काम करेल आणि द्वेष पसरवणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.