जळगाव राजमुद्रा दर्पण दि.9 प्रतिनिधी – भारतात प्रतिभावान युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. हिच प्रतिभा भारताला सामर्थ्यशाली बनवू शकते फक्त तरूणांच्या अवलोकन, विश्लेषण आणि परिश्रमातून नवसंकल्पनेला चालना देणाची गरज आहे. पुरक वातावरणातून ते शक्य आहे. माझ्या भारताला शक्तिशाली देश बनविण्यासाठी, देशाचा उत्कर्ष साध्य करण्यासाठी, युवकांनी चौकटीबाहेरचा विचार करून सर्वात आधी देश ही भावना संवेदनशील मनाने स्वीकारली पाहिजे; असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनाच्या 80 व्या जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘भारत से जुडे रहो’ हा संवादात्मक कार्यक्रमाप्रसंगी कुलगुरू बोलत होते. कस्तूरबा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, प्रमुख वक्ते म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, ज्येष्ठ गांधीयन व समाजसेवक प्रा. शेखर सोनाळकर आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रीसर्च डीन प्रो. गीता धर्मपाल हे उपस्थित होते.
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे रिसर्च डीन प्रो. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविक केले. 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधीजींनी इंग्रजांना चले जाव, भारत छोडोचा नारा दिला. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित असतांना विदेशातील भारतीयांना भारत से जुडे रहा! सांगण्याची गरज आहे. आपण विदेशात राहिलो व पुन्हा भारतात परत येऊन भारताशी स्वत: एकरूप करून घेतले याचा अभिमान असल्याचे सांगितले.
कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी वेगळ्यापद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला देशाला समृद्ध शक्तीशाली बनविण्यासाठी ज्ञानाचे व्यवसायात, समाजाच्या कल्याणासाठी रूपांतर कसे करावे, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. यासाठी छोट्या कल्पनांना मोठ्या प्रकल्पांमध्ये कसे परावर्तित करता येईल; यासाठी प्रयत्न करणे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जैन इरिगेशन होय, असेही कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी आवर्जून सांगितले.
दुसऱ्याचं वेगळेपण आपण स्वीकारले पाहिजे – प्रा. शेखर सोनाळकर
प्रा. शेखर सोनाळकर यांनी मुक्तपणे संवाद साधला. त्यात ते म्हणाले; भारत हा विविध परंपरा, भाषा, दैवत, संस्कृती, खाद्य पदार्थ इत्यादी भिन्न व वेगळेपणाचे आहेत. त्या वैविध्याचा आदरपुर्वक स्वीकारण करणे म्हणजे भारताशी स्वत: जोडून घेणे होय. प्रेम, अहिंसा, संवाद आणि विश्वास हे माणसाला जोडण्याचे काम करत असतात आणि यातून देशभावना, देशप्रेम, जाज्वल्य देशभक्ती जागृत होते. आनंद व्यक्ती जशी सुंदर दिसते तसे माणसे, समाज आणि देश आनंदीत बनवावे. प्रेम, आपलुकीच्या, करूणेच्या, संवेदनशीतेच्या, अहिंसेच्या आधारे आपल्या देशाला आपले म्हणायचे आणि या देशाला आपल्याशी जोडूनच ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उपस्थित मान्यवरांनी उत्तरे दिली. अध्यक्षीय समारोप करतांना अशोक जैन यांनी भारताशी जोडून घेण्याआधी आपण कुटुंबाशी स्वत: ला जोडून घेतले आहे का? असा प्रश्न प्रत्येकाने मनात विचारला पाहिजे आणि तसे सकारात्मक वर्तन करायला हवे, जेणे करून आपण आपल्या देशाकडे कोणत्या नजरेने पाहतो हे समजते. याच भावनेवर भविष्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या भारत महासत्ता होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
दीपप्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रशांत सूर्यवंशी यांनी प्रेरणा गित म्हटले. गिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आभार सुधीर पाटील यांनी मानले. उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरास्वरूपात संवाद साधला. संबंधित कार्यक्रम गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या फेसबुक आणि युट्यूब या अधिकृत लिंकवर बघता येईल.