(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधील विविध समस्यांचा आढावा महापौर सौ. जयश्री सुनील महाजन यांनी आज घेतला. या परिसरातील एस. एम. आय. टी. कॉलेज मागील वाघुळदे कॉलनीसह इतर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या नेहमी समस्यांबाबत तक्रारी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी महापौर सौ जयश्री सुनील महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी परिसरात भेट दिली.
परिसरातील रस्ते, गटारीच्या स्वच्छतेसह घंटागाडी, अमृत योजनेअंतर्गत झालेली कामे यांची गल्लीबोळात जाऊन पाहणी केली. तसेच या भागातील नागरिकांचे विविध प्रश्न व अडचणी समजून घेतल्या. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांना संबंधित प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आदेशही दिले. त्यावेळी नगरसेविका प्रतिभा पाटील, प्रभाग क्रमांक १ चे अधिकारी सोनवणे, शहर अभियंता अरविंद भोसले, आरोग्य निरीक्षक नंदू साळुंके, शाखा अभियंता योगेश वाणी यांच्यासह मनपाचे आरोग्य व बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.