विधानसभेच्या एका जागेसाठी नुकतीच पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणूक पार पडली असून त्यात भाजप आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळाली. यात भाजपच्या समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारत राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव केला. पंढरपुरात कमळ फुलके हे खरे मात्र आता राष्ट्रवादीकडून भाजपच्या विजयमागे काहीतरी षडयंत्र रचल्याचा आरोप करत फेर निवडणूक करण्याची मागणी केली आहे.
पंढरपुरात षडयंत्र रचून भाजपने विजय मिळवला आहे असा आरोप राष्ट्रवादीकडून केला जात असून विधान परिषद आमदार प्रशांत परिचालक आणि भाजप उमेदवार समाधान आवताडे याचे कॉल रेकॉर्ड, घर आणि कारखान्यातील सीसीटीव्ही फुटेज, ऑडिट, बँक डिटेल्स, दोघांच्या कंपन्या आणि संस्थांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. सोबतच माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून संपूर्ण सावळा गोंधळ तपासून घेण्यात यावा आणि या समितीच्या अध्यक्षतेखाली पारदर्शकपणे पुन्हा निवडणूक घेण्यात याव्यात अशी मागणीही मुख्य निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीने पत्रा मार्फत केली आहे.
भाजपचा विजय पचनी न पडल्यामुळे या मागण्या होत असल्याचे चित्र दिसत असून केंद्रीय निवडणूक आयोग आता यावर काय उपाययोजना करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.