(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बी. एच. आर. घोटाळा प्रकरणात आज जळगाव जामनेरसह सात जणांना अटक करण्यात आली असून जळगावात या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या अटकासत्रातून मोठे मासे गळाला लागण्याचा संभव दिसून येत असल्याने या विषयावर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. बी एच आर गैरव्यवहार प्रकरणी अवसायक जितेंद्र कंडारेसह सुनील झंवर हा मुख्य संशयित असून विवेक ठाकरे तसेच सुरज झंवर हे आरोपी आहेत. नुकताच सूरज झंवरचा जामीन मंजूर करण्यात आला असून कंडारे याला फरार आरोपी घोषित करण्यात आले आहे.
या प्रकरणात आज जळगाव मधील भागवत भंगाळे, जामनेर येथील छगन झाल्टे, जितेंद्र पाटील, भुसावळ येथील असिफ तेली, पाळधी येथील जयश्री मणियार व संजय तोतला यांच्यासह एकाला पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या पथकाने अटक केली आहे. यातील जितेंद्र पाटील व छगन झाल्टे हे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असल्याचे बोलले जात असून, महाजन यांच्या महत्त्वाच्या व्यवहारांवर त्यांचे लक्ष असते, त्यामुळे त्यांचे अटकसत्र हे विशेष मानले जात आहे. या प्रकरणात अटक झालेले बरेच जण हे राजकीय वर्तुळातील नातेवाईकांशी संबंधित असल्याने या विषयाला आता विशेष रंग प्राप्त झाला आहे. २०१६ च्या विधान परिषद निवडणुकीतील आर्थिक व्यवहारही आता या प्रकरणात लक्षात घेतले जात असून जळगावातील मातब्बरांची झालेली अटक लक्षणीय ठरत आहे.
या बी एच आर प्रकरणात आता त्रयस्थ अर्जदार म्हणून जळगावातील ऍड. विजय पाटील हे याचिका दाखल करणार असल्याने या प्रकरणात अधिक खोलवर धागेदोरे हाती लागून अजून नावाजलेली मंडळी अटक होण्याची शक्यता दिसून येत आहे. याआधीही ऍड. विजय पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या मदतीने सुनील झंवर मोठमोठे घोटाळे करून राजरोसपणे फिरत असल्याचा आरोप केला होता. आता ऍड. विजय पाटील यांच्या बी एच आर प्रकरणातील समावेशाने या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे जळगावात बोलले जात आहे.