(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. याबाबत काँग्रेसने कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालकांची आर्थिक स्थिती ढासळलेली असल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्यात यावी असे निवेदन यापूर्वीही देण्यात आले होते. तसेच मागील वर्षापासून विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन सुरू आहेत. तरीसुद्धा पूर्ण परीक्षा शुल्क आकारला जाऊन विद्यार्थ्यांकडून कोट्यावधी रुपये जमा केले जात आहेत. ऑनलाईन परिक्षेमुळे सॉफ्टवेअर बनवणार्या कंपन्यांना कोट्यवधींचा फायदा झाला आहे. विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी आकारात आहे. तसेच नागपूर विद्यापीठांमधील व्यवस्थापन सदस्यांनी याबाबत निर्णय घेत ठराव पास केला आहे, तर आपल्या विद्यापीठ व्यवस्थापन सदस्यांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
यासह इतर प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आले आहेत. तरी प्रशासनाने विद्यार्थ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा, अन्यथा विद्यापीठावर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव ऍड. कुणाल पवार, भूषण भदाणे, गणेश निंबाळकर यांनी दिला आहे.