(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) येणाऱ्या काळातील जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढून जिंकणार आहे असा संकल्प व निर्धार माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज जळगावात व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीची वसंत स्मृती भाजप कार्यालय येथे बैठक संपन्न झाली, या वेळी ते बोलत होते.
बैठकीदरम्यान सर्वप्रथम स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बळीराजा मार्गदर्शन व सहाय्यता केंद्राची स्थापना करण्यात आली. माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले की, ‘कोरोनाच्या महामारी मध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्तेच फक्त जनतेच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करत होते. आगामी काळातले पक्षाचे कार्यक्रम हे बूथ स्तरावर राबविण्यात येणार आहेत. येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढून जिंकणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
आमदार राजूमामा भोळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून या योजने दरम्यान जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी गावात एका फोनवर भाजप कार्यकर्ता उपलब्ध होणार असून ही योजना शेतकऱ्यांसाठी चालते-फिरते मदत केंद्र ठरणार असल्याचे वक्तव्य केले. प्रदेशाने दिलेल्या आगामी कार्यक्रम जिल्ह्यात राबवावे अशी माहितीही जिल्हाध्यक्ष यांनी दिली.
बैठकीस माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, अनुसूचित जमाती संपर्क प्रमुख ऍड. किशोर काळकर, किसान मोर्चा उत्तर महाराष्ट्र संयोजक सुरेश धनके, किसान मोर्चा नारायण चौधरी यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.
सदर बैठकीचे सूत्र संचलन के.बी.साळुंखे यांनी व प्रस्तावना मधू काटे यांनी केले. संघटनात्मक आढावा सचिन पानपाटील यांनी घेतला. आभार संतोष खोरखेडे यांनी मानले. बैठकीत जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सर्व जिल्हा आघाड्यांचे अध्यक्ष व मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष, सरचिटणीस पूर्ण वेळ उपस्थित होते.