(मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा) अयोध्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी केलेल्या आरोपावरुन शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवर भाजपाने शिवसेना भवनासमोर आंदोलन केलं असता दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. यानंतर भाजपाने केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना ही सर्टिफाईड गुंडा पार्टी आहे अशा शब्दांत उत्तर दिलं होतं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे.
“कोणी काहीही बोलतं. कोणताही पक्ष स्वतःला गुंड म्हणून घेणार नाही. आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवणं, कायद्याने राज्य चालवणं, नियमाने काम करणं, सर्व सहकाऱ्यांना सोबत घेणं प्रत्येकाची जबाबदारी असून मुख्यमंत्री त्यापद्धतीनेच काम करत आहेत”, असं अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
संजय राऊत यांनी शिवसेना भवनासमोर झालेल्या हाणामारीवर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, “होय शिवसेना गुंडगिरी करते. पण त्याला सत्तेचा माज म्हणणं चुकीचं आहे. सत्तेचा माज दाखवून राडा झाला असता, तर तो खूप वेगळ्या पद्धतीने झाला असता. आमच्या शिवसेना भवनाच्या दिशेनं कुणी चाल करत असेल, तर होय आम्ही गुंड आहोत. ते सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्ही सर्टिफाईड आहोत. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत. ही गुंडगिरी मराठी माणसाने केली म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली. आम्ही ही गुंडगिरी केली म्हणून महाराष्ट्रात, मुंबईत मराठी माणसाचा आवाज आहे”. राऊतांच्या या वक्तव्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली.