मुंबई राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय बदल घडताना दिसून येत आहे. या निवडणुकीसाठी युती करण्याबाबत मनसे व भाजप यांच्यात चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र अजून याबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही, वारंवार होणाऱ्या हायप्रोफाईल बैठका असे संकेत देत आहेत.
मंगळवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली होती. याच्या एक दिवस आधी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीही राज यांची भेट घेतली होती. तर, राज ठाकरे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या मलबार येथील निवासस्थानी पोहोचले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि राज यांच्या पक्षाला सोबत घेऊन सेनेची मराठी वोटबँक स्वत:ची बनवू शकते, असा विश्वास भाजपला असल्याचे बोलले जात आहे.
राज हे भाजपसाठी कसे फायदेशीर ठरतील ? :-
एका मीडिया वृत्तानुसार, बीएमसी निवडणुकीबाबत दोन्ही पक्षांमधील चर्चा प्राथमिक टप्प्यात असल्याचे आंतरिक सूत्रांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडला आक्रमक लढा देऊ शकेल असा तगडा वक्ता राजमध्ये भाजपला दिसतो. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पराभव कसा करायचा हेही त्यांना माहीत आहे.
भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, “राज ठाकरे जागा जिंकू शकणार नाहीत, परंतु भाजपसाठी त्यांच्या सभा महाविकास आघाडीच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यास मदत करतील.” मनसे प्रमुखांच्या 10-12 मोठमोठ्या रॅली फायदेशीर ठरू शकतात असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक समीकरणांवर दोन्ही पक्ष काय म्हणतात :-
मनसेचा एक कार्यकर्ता म्हणतो, “मनसेला बीएमसी निवडणूक लढवायची आहे, पण भाजप आणि शिंदे गटाशी युती करणे योग्य आहे.” पक्षाचा दुसरा नेता म्हणतो, ‘राज साहेब भाजपपुढे शरण जाणार नाहीत. ते त्यांच्या अटींवर ठांब राहतील . त्याच वेळी, भाजपचे रणनीतीकार म्हणाले, “भाजप एकूण 227 जागांपैकी मनसेला 25-30 जागा देऊ शकते, कारण त्यांना शिंदे गटालाही जागा द्यावी लागेल.”
मनसेलाही होऊ शकतो फायदा :-
2017 च्या बीएमसी निवडणुकीत भाजपच्या खात्यात 82 जागा आल्या होत्या. तर शिवसेनेच्या बाबतीत हा आकडा 84 वर पोहोचला आहे. त्यावेळी मनसेला 7 जागा मिळाल्या होत्या. मात्र, दोन वर्षांनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला केवळ एक जागा जिंकता आली. अशा स्थितीत मनसेसमोर पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात पाय रोवण्याची ही संधी असू शकते.